राज्यसातारा

भविष्यात नागरिकांना होणारा त्रास व रस्त्याचा येणारा खर्च नक्की कोण करणार…? (भाग नववा)

कराड : कापिल हौदमळा ते कटपानमळा या परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्यासाठी तब्बल २७ लाख ७० हजार रुपयांची तरतूद करून अंडरग्राउंड बंदिस्त पाईपलाईन व चेंबर्स उभारण्याचे काम करण्यात आले. कागदोपत्री ही योजना गावाच्या विकासाचे प्रतीक म्हणून मिरवली जात असली तरी प्रत्यक्षात या कामाच्या अंमलबजावणीमुळे स्थानिक नागरिकांच्या भविष्यातील अडचणींना आमंत्रण दिल्याचा गंभीर आरोप आता होत आहे. लोकांच्या आरोग्याचा आणि सोयीचा विचार करून केलेल्या या कामातच मोठ्या त्रुटी राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या बंदिस्त पाईपलाईनमध्ये हौदमळा व कटपानमळा परिसरातील अनेक घरांमधील बाथरूमचे पाणी तसेच विविध प्रकारचे सांडपाणी सोडले जात आहे. सांडपाण्याचा हा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी वेळोवेळी चेंबर्स उघडून तपासणी आणि साफसफाई करणे अत्यावश्यक असते. मात्र या ठिकाणी प्रत्यक्षात जे काम करण्यात आले आहे ते पाहता भविष्यात या व्यवस्थेची देखभाल करणेच अशक्य होईल, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

कटपानमळा परिसरात ठेकेदाराने साधारण सात चेंबर्स जमिनीपासून तब्बल तीन फूट खाली बसवून त्यावर झाकण टाकून पूर्णपणे बंद केले आहेत. त्यानंतर त्या चेंबर्सवर मुरूम-खडी टाकून थेट डांबरीकरण करून रस्ता तयार करण्यात आला आहे. परिणामी हे चेंबर्स प्रत्यक्षात रस्त्याखाली गाडले गेले असून भविष्यात त्यांच्यापर्यंत पोहोचणे जवळपास अशक्य बनले आहे. सामान्यतः सांडपाणी व्यवस्थेतील चेंबर्स हे जमिनीच्या पातळीवर ठेवले जातात, जेणेकरून देखभाल आणि तपासणी सुलभ होईल. मात्र येथे करण्यात आलेली ही रचना अनेक गंभीर प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे.

भविष्यात या पाईपलाईनमध्ये मलिदा, गाळ किंवा विविध प्रकारचा कचरा साचून पाईपलाईन चोकअप झाल्यास परिस्थिती अत्यंत गंभीर होण्याची शक्यता आहे. कारण त्या वेळी चेंबर किंवा पाईपलाईन साफ करण्यासाठी सर्वप्रथम तयार झालेला डांबरी रस्ता उखडावा लागणार आहे. एकीकडे गावाचा विकास म्हणून रस्ता करण्यात आला, तर दुसरीकडे त्याच रस्त्याला पुन्हा उकरण्याची वेळ येणार असेल, तर या नियोजनामागील हेतू काय असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

याच ठिकाणी सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे जबाबदारीचा आहे. पाईपलाईन चोकअप झाल्यानंतर रस्ता नेमका कोण उखरणार? पाईपलाईन व चेंबर्सची साफसफाई कोण करणार? आणि त्यानंतर पुन्हा उखरलेला रस्ता कोण करणार? या प्रश्नांची कोणतीही स्पष्ट व्यवस्था दिसून येत नाही. परिणामी भविष्यात प्रशासकीय यंत्रणा, ठेकेदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जबाबदारी ढकलण्याचा खेळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. पाईपलाईन चोकअप झाल्यास सांडपाणी रस्त्यावर साचणे, दुर्गंधी पसरने, डासांची उत्पत्ती वाढणे आणि संसर्गजन्य आजार पसरने अशा समस्या निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. गावातील लहान मुले, वृद्ध आणि महिलांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा विषय केवळ तांत्रिक न राहता मानवी जीवनाशी संबंधित गंभीर प्रश्न ठरत आहे.

दरम्यान, काही स्थानिकांकडून असा गंभीर आरोपही करण्यात येत आहे की या कामामध्ये चेंबर्स रस्त्याखाली दडपून टाकण्यामागे भविष्यातील दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा खर्च वाढवण्याचा हेतू असू शकतो. पाईपलाईन चोकअप झाल्यानंतर रस्ता उखरणे, साफसफाई करणे आणि पुन्हा रस्ता तयार करणे अशा प्रक्रियेत मोठा खर्च होणार असल्याने हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला असावा, असा संशयही व्यक्त होत आहे.

गावाच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी हा लोकांच्या सुखसोयीसाठी असतो; मात्र जर त्या कामातूनच भविष्यात लोकांच्या डोकीवर नवे संकट निर्माण होत असेल, तर हा विकास नसून लोकांच्या भावनांशी केलेला खेळ असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची तांत्रिक तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करावी आणि नागरिकांना भविष्यातील संकटातून वाचवावे, अशी जोरदार मागणी आता स्थानिकांकडून पुढे येत आहे.

पुढील भागात – उकरलेला रस्ता कॉन्ट्रॅक्टदार नक्की करणार कधी..?

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close