
कराड ः विरोधात तक्रार केल्याच्या कारणावरून सतनाम एजन्सीच्या मॅनेजरला कोयता, हॉकी स्टीक, दांडक्याने सातजणांनी बेदम मारहाण केल्याची घटना मुंढे गावच्या हद्दीत गुरूवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत निखील बलराम पोपटानी (वय 35, रा. मलकापूर) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी सातजणांवर रस्ता अडवणे, दरोडा, शिवीगाळ, दमदाटी करणे, धमकी देणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
उमेश चंदवानी, अनिल चंदवानी, आण्णा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर रितेश घारे (रा. घारेवाडी, ता. कराड), सूरज पाटील (रा. बाबरमाची, ता. कराड), कपिल लोंढे (रा. खोडशी, ता. कराड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निखील पोपटानी हे मुंढे येथील सतनाम एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणुन काम करतात. ते अनिल गोपीचंद बसंतानी यांचे न्यायालयातील कामकाजही पाहतात. बसंतानी व उमेश चंदवानी, अनिल चंदवानी यांचा मुंढे येथील जमीनीच्या मालकी हक्कावरून न्यायालयात दावा सुरू आहे. निखील पोपटांनी हे त्यांचे दैनंदिन कामकाज करत असताना त्यांना संबंधित जागेवर उमेश चंदवानी व अन्य लोक जमले असल्याची माहिती एकाने दिली. त्यावर ते एजन्सीची 3 लाख 82 हजाराची रोख रक्कम असलेली बॅग घेऊन कराडकडे जाता जाता मुंढे येथील संबंधित वादादील प्लॉटवर गेले. त्यावेळी त्यांना उमेश चंदवानी व अन्य काहींनी पाहिले. त्यावर त्यांनी त्याला पकडा असे ओरडून सांगितले. त्यावेळी निखील पोपटानी हे घाबरून गाडी घेऊन तेथून पुढे निघुन गेले. विमानतळापुढील एका पेट्रोलपंपाच्या पुढे गेल्यावर पाठीमागून चारचाकी गाडीतुन आलेल्या उमेश, अनिल चंदवानी व आण्णा यांनी गाडी आडवी मारून त्यांना थांबविले. त्यावेळी उमेश चंदवानी याने तु आमचे विरोधात तक्रार करतोस का, तुला व तुझ्या अनिल शेठला ठेवत नाही असे म्हणत उमेश याने पोपटांनी यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यानंतर अनिल चंदवानी व आण्णा याने हॉकी स्टीक व लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यावेळी उमेश चंदवाणी हा सिंधी भाषेत याला खल्लास कर असे म्हणत होता. त्यानंतर पाठीमागील गाडीतून आलेल्या अन्य चौघांनी पोपटांनी यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी संबंधितांनी पोपटानी यांच्या हाताच्या बोटातील पावणेदोन तोळ्याची सोन्याची अंगठी, मोबाईल, व बॅगेतील रोख रक्कम असा मिळून चार लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल नेल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. त्यावरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड करीत आहेत.