राज्यसातारा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन

कराड : महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवणाऱ्या क्षणाला साक्षी ठरवत, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा अजित पवार यांनी सोमवारी येथील प्रीतिसंगमावर जाऊन आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत भावपूर्ण अभिवादन केले.

स्व. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर अवघ्या काही दिवसांत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांचा हा दौरा केवळ औपचारिक नव्हता, तर तो एका वैचारिक वारशाला दिलेली साक्ष होता. पुष्पचक्र अर्पण करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली शांतता आणि डोळ्यांत दाटलेली भावना, उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली.

यशवंतराव चव्हाण आणि अजित पवार यांचे कराडशी असलेले भावनिक नाते सर्वश्रुत आहे. आयुष्यातील महत्त्वाच्या प्रत्येक टप्प्यावर अजितदादांनी प्रीतिसंगमावर येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन केले. ‘माझे राजकारण आणि समाजकारण हे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर आधारलेले आहे,’ असे ते वारंवार सांगत. आज त्याच परंपरेचा वारसा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पुढे नेत असल्याचे चित्र या भेटीतून स्पष्ट झाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार नितीनकाका पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close