राज्यसातारा

आंदोलनाला नवी धार; १५ ऑगस्टला ‘सामान्य जनतेच्या घासाचा सन्मान अन्नसुरक्षा जनस्नेह भोजन’, २८ ऑगस्टला रक्षाबंधन विशेष कार्यक्रम – चौकशी समितीला गांभीर्याचा इशारा

कराड : पुरवठा विभागातील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला आता ३६ दिवस पूर्ण होत असून, आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यासाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी संबंधित प्रशासनाची आवश्यक परवानगी घेण्यात येणार असून, शासनाच्या वरिष्ठ कार्यालयांशीही आवश्यक पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.

विभागीय आयुक्त पुणे, उप आयुक्त पुरवठा पुणे, जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा, उपविभागीय अधिकारी कराड, उपविभागीय पोलिस अधिकारी कराड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर या सर्वांना पत्र व्यवहार करण्यात आला असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

१५ ऑगस्ट : सामान्य जनतेच्या घासाचा सन्मान अन्नसुरक्षा जनस्नेह भोजन’

स्वातंत्र्यदिनानिमित्त आंदोलनाच्या ४७ व्या दिवशी आंदोलनस्थळी सुमारे १०० ते १५० नागरिकांसाठी सामुदायिक भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे शासन गोरगरीब जनतेला गहू व तांदूळ उपलब्ध करून देते. त्याच संकल्पनेला अधोरेखित करण्यासाठी गव्हाच्या रव्याचा शिरा, तांदळाचा पुलाव (भात) आणि डाळीचा तडका असा भोजनाचा बेत ठेवण्यात आला आहे. या उपक्रमातून गरीबांच्या अन्नाच्या हक्काबाबत जनजागृती करणे, अन्नाचा सन्मान राखणे आणि समाजात बंधुभावाचा संदेश देणे हा उद्देश असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

२८ ऑगस्ट : आंदोलनाच्या ६० व्या दिवशी रक्षाबंधन विशेष कार्यक्रम

आंदोलनाच्या ६० व्या दिवशी येणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त आंदोलनस्थळी सहभागी आंदोलनकर्त्यांना त्यांच्या बहिणींच्या हस्ते राखी बांधून ओवाळणी करण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून गरीबांच्या अन्नसुरक्षेच्या संरक्षणाचा संकल्प, सामाजिक ऐक्य आणि न्यायासाठी सुरू असलेल्या संविधानिक संघर्षाला अधिक बळ देण्याचा संदेश दिला जाणार आहे.

आंदोलनस्थळी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम
आंदोलनाला अधिक व्यापक लोकसहभाग मिळावा आणि समाजात सकारात्मक जनजागृती व्हावी, यासाठी पुढील काळात आंदोलनस्थळी विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे
आंदोलनकर्त्यांनी जाहीर केले आहे. प्रत्येक कार्यक्रमासाठी संबंधित प्रशासनाची पूर्वपरवानगी घेण्यात येईल आणि सर्व कार्यक्रम शांततापूर्ण व कायदेशीर मार्गानेच पार पडतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

चौकशी समितीला गांभीर्याचा इशारा

पुरवठा विभागासंदर्भातील प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीने आंदोलनकर्ते शांततापूर्ण आणि संयमाने आंदोलन करत आहेत म्हणजे आंदोलनाची तीव्रता कमी झाली आहे किंवा आंदोलनकर्ते पुढील कोणतीही भूमिका घेणार नाहीत, असा कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

चौकशी समितीने उपलब्ध कागदपत्रे, पुरावे आणि नोंदींची सखोल, निष्पक्ष व वस्तुनिष्ठ तपासणी करून योग्य अहवाल शासनाकडे शक्य तितक्या लवकर सादर करावा. गरीबांच्या अन्नसुरक्षेशी संबंधित विषय असल्याने या प्रकरणात अनावश्यक विलंब होऊ नये आणि नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी आंदोलनकर्त्यांची ठाम मागणी आहे.

आंदोलनकर्त्यांनी पुढे स्पष्ट केले की, सध्या सुरू असलेले धरणे आंदोलन पुढील टप्प्यात ठिय्या आंदोलनात रूपांतरित करण्यात येईल. त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. न्याय मिळेपर्यंत संविधानिक, लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गाने संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close