
पाटण ः ढेबेवाडी वांगनदी संगमानजीक ढेबेवाडी-कराड रस्त्याच्या शेजारी शेताकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कुसूर (ता. कऱ्हाड) येथील एका व्यवसायिक युवकाचा खून झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. ऋतुराज दिलीप देशमुख (वय 31) असे संबंधित खून झालेल्या युवकाचे नाव असून या खुनामागचे नेमके कारण उलगडण्याचे आणि संशयितांचा शोध घेण्याचे काम ढेबेवाडी पोलिसांकडून सुरू आहे. याबाबत अक्षय दिलीप देशमुख याने ढेबेवाडी पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वैभव काळे (रा. मालदन, ता. पाटण), उमर मुल्ला (रा. ढेबेवाडी, ता. पाटण), शुभम खेडेकर (रा. ढेबेवाडी, ता. पाटण) अशी खूनप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत
ढेबेवाडी ता. पाटण येथे वांगनदी संगमापासून अलीकडेच काही अंतरावर ढेबेवाडी-कऱ्हाड रस्त्याला जोडून तयार केलेल्या कच्च्या रस्त्यावर सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत येथील पोलिसांना माहिती मिळताच ढेबेवाडी पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सपकाळ व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहचले.
घटनास्थळी संबंधित युवक रक्ताच्या थारोळ्यात जखमी स्थितीत पडलेला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना अँब्युलन्सने उपचारासाठी कऱ्हाडला नेले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दगडाने ठेचून खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
अक्षय देशमुख याने दिलेल्या फिर्यादित म्हंटले आहे की, माझा भाऊ ऋतुराज दिलीप देशमुख हा उमा महेश बारमध्ये बसलेला असताना वरील संशयित आरोपी यांनी बारमध्ये जाऊन ऋतुराज देशमुख यास दमदाटी करून बार मधून बाहेर घेऊन जाऊन वांग नदी पुलाजवळ असलेल्या पडीक शेतात नेऊन त्यांना डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी करून त्याचा खून केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड, तसेच पाटण तालुक्यातील विविध पोलिस ठाण्याचे अधिकारी, फॉरेन्सिक लॅबचे पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. खुनामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी कसून तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी तपास करत आहेत.