राजकियराज्यसातारा

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज : निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे

कराड : सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समितीसाठी दि. ७ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या निवडणुका शांततेत व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी झाल्याचे सांगून निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीचा सुरू असलेला उत्सव शांततेने पार पाडून जनतेने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले आहे. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी प्रताप पाटील उपस्थित होते.

निवडणुकीच्या संपूर्ण व्यवस्थेची माहिती देताना प्रांताधिकारी म्हेत्रे म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान होत असून मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. पासून सुरू होणार आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या १२ व पंचायत समितीच्या २४ गणांसाठी ४८६ मतदान केंद्रे असून एकूण ४ लाख ६ हजार ६०६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार २ लाख ६ हजार ४४९, महिला मतदार २ लाख १३४ तर इतर २३ मतदार मतदार आहेत.

या ४८६ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पूर्ण करणेकामी २१४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले व दुसरे प्रशिक्षण संपन्न झाले आहे. तिसरे प्रशिक्षण ६ फेब्रुवारी २०२६ रोजी शासकीय धान्य गोदाम कराड येथे सकाळी ९ वा. होणार आहे. ४८६ मतदान केंद्रावर मतदानासाठी पाठविण्यात येणारी ४८६ मतदान यंत्रे व दहा टक्के राखीव ५० अशी एकूण ५३६ मतदान यंत्रे सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.

वरील सर्व मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तिसरे प्रशिक्षण झाल्यानंतर ६६ एसटी बस, १८ मिनी बस व ८ जीप अशा एकूण ९२ वाहनांमधून नियुक्त कर्मचारी केंद्राकडे रवाना करण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावरील मूलभूत सुविधा लाईट, पाणी, फर्निचर व रॅम्प इत्यादी परिपूर्ण करण्यात आल्या आहेत. निवारा नसलेल्या ग्रामपंचायतींच्या बाहेर मंडप उभारणी करून निवाऱ्याची सोय करण्यात येणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रचार व प्रसार करणे कामी स्वीप पथकाच्या माध्यमातून कामकाज राबविण्यात आले असून नेहमीप्रमाणे यावेळीही कराड तालुक्याची मतदानाची टक्केवारी वाढेल अशी मला खात्री असल्याचे सांगून निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी प्रशासन, पोलीस यंत्रणा, राजकीय पक्ष, उमेदवार, मतदार व समाज माध्यमे अशा सर्वच घटकांनी परस्पर सामंजस्याने आपली भूमिका पार पाडून निवडणूक हा संघर्ष नसून लोकशाहीचा उत्सव आहे, अशा भावनेतून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close