राजकियराज्यसातारा

कराड पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा 

जिल्हा परिषदेतही भाजपचे निर्विवाद वर्चस्व; कार्यकर्त्यांचा जल्लोष, विरोधकांना धक्का

कराड : तब्बल आठ-नऊ वर्षांनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कराड तालुक्यात मोठे स्थित्यंतर घडले आहे. कराड पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपने एकहाती सत्ता स्थापन करत तब्बल १३ जागा जिंकल्या, तर जिल्हा परिषदेतही ८ जागांवर विजय मिळवत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले. अनेक दशकांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सत्तेला भाजपने जबरदस्त धक्का दिला असून, या निकालामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर विजयी उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. कराड शहरासह ग्रामीण भागात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० वाजता टपाली मतमोजणीस सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी १०.१५ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीच्या पहिल्या फेरीला प्रारंभ झाला. सुरुवातीपासूनच भाजपने अनेक गट व गणांमध्ये निर्णायक आघाडी घेत विरोधकांवर दबाव निर्माण केला. वारुंजी जिल्हा परिषद गट वगळता बहुतांश ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर राहिले. वारुंजी गटात मात्र काँग्रेसने आपली पकड कायम ठेवत विजय मिळवला.
कराड दक्षिण मतदारसंघात आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मोठे यश संपादन केले. या भागात काँग्रेसला केवळ वारुंजी गट व गण इतक्याच जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी आपला येळगाव व सवादे हा बालेकिल्ला अबाधित ठेवत पक्षाची मान राखली.
कराड उत्तर मतदारसंघातही आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दमदार कामगिरी केली. येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला एकाही जिल्हा परिषद गटात विजय मिळवता न आल्याने मोठी निराशा पदरी पडली. या मतदारसंघात भाजप नेते रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पत्नी विद्या वेताळ यांनी अपक्ष म्हणून लढत मोठा विजय मिळवला. तसेच शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ने पंचायत समितीची एक जागा जिंकत खाते उघडले.
तालुक्यातील गट व गणांतील पक्षनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे; पाल गट – माधवराव काळभोर (भाजपा) १९४४४, पाल गण – प्रताप चव्हाण (रा.कॉ. श.प.), ५७१४, चरेगाव गण – धैर्यजा माने (भाजपा) ४४८२, उंब्रज गट – रणजीत जाधव (भाजपा) १०५३४, उंब्रज गण – संगिता चव्हाण (राष्ट्रवादी – शरद पवार) ४५२२, तळबीड गण – संग्रामबाबा पवार (काँग्रेस) ५८४२, मसूर गट – लालासो जगदाळे (भाजपा) ८५२८, मसूर गण – संतोष पाटील (भाजपा) ५४७६, वडोली भि. गण – कोमल यादव (भाजपा) ५४३४, कोपर्डे हवेली गट – विद्या वेताळ (अपक्ष) ९४४३, कोपर्डे हवेली गण – सिद्धार्थ चव्हाण (राष्ट्रवादी – शरद पवार) ३९०५, वाघेरी गण – अनिता वेताळ (भाजपा) ४८२३, सैदापूर गट – सागर शिवदास (भाजपा) ६३७३, सैदापूर गण – माधवी पाटसुपे (भाजपा) १०४०, हजारमाची गण – प्रियांका पळसे (भाजपा) ३७१७, वारुंजी गट – सुनंदा पाटील (काँग्रेस) १२३४०, वारुंजी गण – रविंद्र बडेकर (काँग्रेस) ६२३०,
कोयना वसाहत – नरेंद्र नांगरे-पाटील (भाजपा) ६३१६, तांबवे गट – धनंजय ताटे (भाजपा) ९१६२, तांबवे गण – दिनेश कुंभार (शिवसेना) ५२८६, सुपने गण – जयश्री पाटील (शिवसेना) ४५६७, विंग गट – शैलजा शिंदे (भाजपा) १११११, विंग गण – नंदाताई यादव (भाजपा) ५२५२, कोळे गण – अर्जुन कराळे (भाजपा) ५४४५, कार्वे गट – विजया थोरात (राष्ट्रवादी-अजित पवार) १२३९९, कार्वे गण – पूजा काटवटे (राष्ट्रवादी-अजित पवार) ७५०५, गोळेश्वर गण – दादासो मरगळे (भाजपा) ५८५५, रेठरे बुद्रुक गट – प्रियांका साळुंखे (भाजपा) ६००९०, रेठरे बुद्रुक गण – धनंजय पाटील (भाजपा) ८६४६, शेरे गण – वर्षा निकम (भाजपा) ६५९७, काले गट – मनिषा पाटील (भाजपा) १५१००, काले गण – गोविंद गावडे (भाजपा) ६४७०, कालवडे गण – स्वाती थोरात (राष्ट्रवादी-अजित पवार) ६३०४, येळगाव गट – उदयसिंह पाटील-उंडाळकर, (राष्ट्रवादी-अजित पवार) १४१६६, येळगाव गण – वृषाली पाटील (राष्ट्रवादी-अजित पवार) ५४४९, सवादे गण – नितीन थोरात (राष्ट्रवादी-अजित पवार) ६९१७ अशी विजयी मते मिळाली.
 प्रसारमाध्यमे ‘पिंजऱ्यात’, प्रशासनावर नाराजी
मतमोजणी केंद्रावर प्रसारमाध्यम प्रतिनिधींना जाळीबंद पिंजऱ्यासारख्या जागेत बसवण्यात आल्याने पत्रकारांनी निवडणूक प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, एका उमेदवारास केंद्रात प्रवेश नाकारण्यात आल्याने पोलीस व उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. यावर संबंधित उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध नोंदवला.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close