राजकियराज्यसातारा

सातारा जि. प. व कराड पं. स. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सेक्टर अधिकारी व मत मोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

पारदर्शक व अचूक कामाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना

कराड : सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व सेक्टर ऑफिसर्स, मत मोजणी अधिकारी व पर्यवेक्षक यांचे अचूक, पारदर्शक व शिस्तबद्ध कामकाज व्हावे, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सविस्तर प्रशिक्षण घेतले.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे व अति. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, दक्षता व नियमांचे काटेकोर पालन याबाबत अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणत्याही कर्मचाऱ्यास मोबाईल फोन अथवा कॅमेरा मतमोजणी कक्षात आणण्यास सक्त मनाई असल्याच्या स्पष्ट सूचना निवडणूक निर्णय अधिकारी म्हेत्रे यांनी दिल्या. मतमोजणीसाठी गट व गण मिळून एकूण २४ टेबल्सवर कामकाज चालणार असून, जिल्हा परिषद उमेदवारासाठी दोन तर पंचायत समिती उमेदवारासाठी एक काउंटिंग एजंट नेमण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

मतमोजणीचा पहिला राऊंड साधारण ४० मिनिटांत पूर्ण होईल, तर पुढील सर्व राऊंड २० ते २५ मिनिटांत पार पडतील, असेही त्यांनी सांगितले.

सर्व सेक्टर अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राध्यक्षांशी सतत समन्वय साधून मतदान केंद्रे वेळेत व सुस्थितीत संबंधित ठिकाणी पोहोचली आहेत की नाही, याची काटेकोर तपासणी करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. मतदान केंद्र वेळेत पोहोचले असून सर्व पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे, याबाबत मतदान केंद्राध्यक्षांकडून ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मॉकपोल दरम्यान घ्यावयाची काळजी, तसेच राखीव ईव्हीएम मशिन्सबाबतची आवश्यक माहितीही यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आली. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close