
कराड ः कराड-विटा रोडवर हजारमाची ता. कराड गावच्या हद्दीत देशी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरणाऱ्या युवकास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 65 हजार रूपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
शाहरूख मेहबुब मुल्ला उर्फ सॅम (वय 25, रा. रेव्हेन्यू कॉलनी, मुसाभाई चाळ, शनिवार पेठ, कराड) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर व परिसरात अवैध शस्त्राचे प्रमाण मोठ्या वाढले असून त्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कराड-विटा रोडवर हजारमाची गावच्या हद्दीत हॉटेल राजवाडा जवळील पत्र्याच्या शेडजवळ एकजण विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल बाळगून फिरत आहे. तात्काळ डीबी पथकाने घटनास्थळी जावून त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे 65 हजार रूपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस असा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



