
कराड : मालमत्ता पत्रकावर गृहकर्जाचा बोजा चढविण्यासाठी 7 हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या भूमी अभिलेखच्या अधिकार्याला रंगेहाथ पकडण्यात आले. सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी कराडात ही कारवाई केली.
कुंडलिक खंडू मोडक (वय 38, रा. राजनंदिनी रेसिडेन्सी, होली कॉलनीच्या मागे, कराड, मूळ रा. खटकाळे, ता. जुन्नर, जि. पुणे) असे त्या अधिकार्याचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला त्याच्या मालमत्ता पत्रकावर गृहकर्जाचा बोजा चढवायचा होता. त्यासाठी कराडच्या भूमि अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील परीक्षकन भूकरमापक कुंडलिक मोडक याने तक्रारदाराकडे सात हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. मंगळवारी पंचांसमक्ष सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना कुंडलिक मोडक याला ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत.



