
कराड : सर्वसामान्य नागरिकांच्या अन्नसुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेबाबत विविध स्तरांवर गंभीर तक्रारी पुढे येत आहेत. नवीन शिधापत्रिका मंजुरी, नाव समाविष्ट करणे अथवा वगळणे, शिधापत्रिकेचे स्थलांतर, १२ अंकी डिजिटल क्रमांकाशी संबंधित प्रक्रिया, तसेच धान्य वितरण साखळीपर्यंत अनेक प्रकारच्या कथित अनियमितता आणि आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप नागरिकांकडून सातत्याने केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर, पुरवठा विभागातील कथित गैरव्यवहारांचा सखोल आढावा घेणारी विशेष वृत्तमालिका लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संबंधित नागरिकांच्या तक्रारी, उपलब्ध कागदपत्रे, प्रशासनाकडे करण्यात आलेले पत्रव्यवहार, विविध नोंदी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बाजू यांचा अभ्यास करून ही वृत्तमालिका प्रकाशित केली जाणार आहे.
या भागात खालील मुद्द्यांवर विशेष प्रकाश टाकण्यात येणार आहे:
नवीन शिधापत्रिका मंजुरी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि कथित आर्थिक मागण्या.
कुटुंबातील सदस्यांची नावे समाविष्ट करणे किंवा वगळणे, तसेच दुरुस्ती प्रक्रियेतील गोड बंगाल
एका गावातून दुसऱ्या गावात शिधापत्रिका स्थलांतर (Transfer) व रद्द प्रक्रियेतील कथित गैरप्रकार.
१२ अंकी डिजिटल शिधापत्रिका क्रमांकाशी संबंधित प्रक्रियेमधील तक्रारी.
स्वस्त धान्य दुकानदार आणि पुरवठा यंत्रणेतील कथित संगनमताबाबतचे आरोप.
सरकारी धान्य गोदामांमधील साठवणूक, धान्याची गुणवत्ता, वाहतूक, वितरण आणि काळ्या बाजाराशी संबंधित नागरिकांनी केलेले आरोप.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता, जबाबदारी आणि उत्तरदायित्वाच्या प्रश्नांचा सविस्तर वेध.
या भागाचा उद्देश कोणावरही पूर्वनिश्चित निष्कर्ष काढणे नसून, नागरिकांकडून सातत्याने पुढे येणाऱ्या तक्रारी, उपलब्ध पुरावे, संबंधित यंत्रणांची भूमिका आणि प्रशासनाची बाजू जनतेसमोर वस्तुनिष्ठपणे मांडणे हा आहे.
“गरिबांच्या हक्काच्या अन्नसुरक्षा योजनेत जर कुठे भ्रष्टाचार, गैरव्यवहार किंवा आर्थिक शोषण होत असेल, तर तो जनतेसमोर आणणे ही सामाजिक जबाबदारी आहे,” या भूमिकेतून ही विशेष भाग प्रकाशित केली जाणार असून, प्रत्येक भागात नवीन माहिती आणि तथ्यांसह कथित काळ्या कारभाराची पोलखोल करण्यात येणार आहे.



