उद्धव ठाकरेंना नको तिथे पहायची सवय लागली आहे
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा

संभाजीनगर : मुंबईतील न्हावा शेवा सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. या उद्घाटनावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा फोटो का नव्हता?
असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता शिंदे गटाकडून उत्तर देण्यात आला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेजी, तुम्ही नरेंद्र मोदीसाहेबांची बरोबरी करू नका!, असा घणाघातही शिरसाट यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांचा चष्मा अशाच अँगलकडे जातो. नको तिथे पाहायची त्यांना सवयच लागली आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावेळी देखील त्यांनी अशीच टीका केली होती. अशा बारीक गोष्टी मुद्दाम शोधायच्या आणि अटलजी चा फोटो का नव्हता? अटलजीचे नातेवाईक का नव्हते? हा उद्धव ठाकरे यांचा बालिशपणा आहे. बालिशपणा हाच शब्द त्यांना लागू होतो, असं संजय शिरसाट म्हणालेत.
उद्धव ठाकरे यांनी आज बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कालाराम मंदिरात महाआरतीला आमंत्रित केलं आहे. त्यावरूनही शिरसाट यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. काळाराम मंदिरात राष्ट्रपतींना यांच्यामुळे निमंत्रण मिळणार आहे का? राष्ट्रपती थेट येऊ शकत नाहीत का? काळाराम मंदिरांची याची मालकी आहे का? काळाराम मंदिरात तुम्ही किती वर्षांनी जात आहात? मोदी साहेब काळाराम मंदिरात गेले याचंही यांना वावडं आहे. काळाराम मंदिरमध्ये उद्धव ठाकरे यापूर्वी किती वेळा गेले होते, हे त्यांनी सांगावं. तुम्ही मोदी साहेबांची बरोबरी करू नका, असं संजय शिरसाट म्हणाले.