
कराड : गणेश आगमन मिरवणुकीत लेझर बिमचा उपयोग करीत डीजेचा दणदणाट करून वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी मंडळाच्या अध्यक्षासह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर येथे रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एलईडी स्क्रीन, लेझर बिम, डीजे, ट्रॅक्टर-ट्रॉलीसह सुमारे बारा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मंडळाचा अध्यक्ष अमोल उर्फ दत्तात्रय सुर्यवंशी (रा. जवाहरनगर-मलकापूर), अनिकेत सुरेश पवार (रा. गोळेश्वर, ता. कराड), डीजेचा ऑपरेटर सागर मारूती पवार (रा. आगाशिवनगर), अविनाश विलास हजारे (रा. जवाहरनगर-मलकापूर), सौरभ गोंदरे (रा. कार्वे, ता. कराड) व जनरेटर टेम्पो चालक राजेंद्र शिवाजी कणसे (रा. विंग, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर-जवाहरनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी गणेश व शिवजयंती उत्सव मंडळाच्या गणेशमुर्तीचे आगमन रविवारी रात्री मिरवणुकीने झाले. या मिरवणुकीत परवानगीशिवाय डीजे व एलईडी स्क्रिनचा वापर करण्यात आला. सायंकाळी चार वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री दहा वाजेपर्यंत ढेबेवाडी फाटा ते मलकापूर या मुख्य रस्त्यावरून चालली. या कालावधीत पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावरील दोन्ही लेन आणि गावातील रस्ते अडवले गेले. परिणामी नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांना पाच ते सहा तास वाहतूक कोंडीत ताटकळावे लागले. मिरवणुकीत ट्रॅक्टर वर परवानगीशिवाय लोखंडी फ्रेम बसवून डीजे आणि एलईडी स्क्रिन लावण्यात आली होती. पोलिसांनी वारंवार आदेश देवुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न करताच सौरभ गोंदरे पसार व जनरेटर टेम्पोचालक राजेंद्र कणसे पळून गेले. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत डीजे यंत्रणा, बीम लाईट्स, डीजे साहित्य, ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उपमुख्यमंत्र्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका
उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी सायंकाळी कारने सातार्याहून कोल्हापुरला निघाले होते. मात्र, महामार्गावरील वाहतूक कोंडीत त्यांचा ताफा अडकला. मलकापुरपासून सातारा बाजुला तासवडेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नियोजित कोल्हापूर दौर्यात बदल करून त्यांनी कराडच्या शासकीय विश्रामगृहावर मुक्काम केला. यावेळी पोलिसांच्या प्रोटोकॉलसाठी झालेल्या हालचालींवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.