
कराड : कराड शहरात शनिवार दि. ६ रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकांसाठी शहरी व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करतात. यामुळे वाहतुकीची कोंडी, अपघात अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी कराड शहर पोलीस प्रशासनाने वाहतूक नियोजनात बदल करून नागरिकांना सूचना दिल्या आहेत.
यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामध्ये दत्त चौक–यशवंत हायस्कूल–आझाद चौक–नेहरू चौक–चावडी चौक–बालाजी मंदिर–झेंडा चौक–कृष्णा घाट या मुख्य मिरवणूक मार्गावर कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश किंवा पार्किंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ही वाहतूक कोल्हापूर नाका बाजूकडील वाहतूक दत्त चौक–आझाद चौक–सात शहीद चौक–शुक्रवार पेठ–बालाजी मंदिर या मार्गे वळवण्यात येईल.
तसेच कृष्णा नाका बाजूकडील वाहतूक कृष्णा नाका–जोतीबा मंदिर–कमानी मारुती मंदिर–सोमवार पेठ–जनकल्याण बँक या मार्गे एकेरी पद्धतीने चालवली जाणार असून, कमानी मारुती मंदिरातून कृष्णा नाक्याकडे येणाऱ्या वाहनांना बंदी असेल. तर कृष्णा नाका–जोतीबा मंदिर–कमानी मारुती मंदिर–चावडी चौक–कृष्णा घाट मार्ग संपूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
मिरवणूक मार्गात काही अडथळा निर्माण झाल्यास कर्मवीर पुतळा–पोस्ट ऑफिस–डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा–जोतीबा मंदिर हा पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. पोपटभाई पेट्रोल पंपाकडून दत्त चौकाकडे येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी असून, ही वाहने भेदा चौक–विजय दिवस चौक–कृष्णा नाका मार्गे विटा बाजूकडे वळवली जातील. गणेश मुर्ती विसर्जनानंतर ही वाहने नदीपात्रातील वाळवंटातून तयार केलेल्या रस्त्याने स्मशानभूमी–जोतीबा मंदिर–कृष्णा नाका मार्गे बाहेर जातील.
वरील सर्व बदलांमध्ये रुग्णवाहीका, अग्निशमन दलाची वाहने तसेच पोलीस वाहने यांना अपवाद ठेवण्यात आला असून त्यांना नेहमीप्रमाणे मार्ग उपलब्ध राहील. गणेश विसर्जन सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी नागरिकांनी वाहतूक बदलाचे नियम पाळून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पार्किंग व्यवस्था
गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने निश्चित केलेल्या ठिकाणीच पार्क करावीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी खालील ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. यामध्ये शिवाजी उद्यान व कन्याशाळेसमोरील मोकळी मैदाने, श्री साईबाबा मंदिर ट्रस्टचे मैदान, दत्त चौक
जनता पे अँड पार्क, यशवंत हायस्कूल मागील मैदान, आपत्कालीन सेवांना मुभा आहे.