
कराड ः सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावाने स्वातंत्र्यपुर्व काळापासुन चांगले काम केले आहे. जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांचा ऋणानु्बंध या गावाशी होता. त्यामुळे या गावाची वैचारीक उंची मोठी आहे. या गावातील सामाजीक एकोपाही राज्यासाठी आदर्शवत आहे. तांबवे गावातील संगम गणेश मंडळाने हा एकोपा वाढवण्यासाठी केलेले काम राज्यातील अन्य मंडळांसाठी आदर्शवत आहे, असे गौरवोदगार साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी काढले.
तांबवे येथील संगम गणेश मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदू-मुस्लिम समाज बांधवांकडुन एकत्रीत आऱती आणि विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. साताऱ्याच्या अतिरीक्त पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, कराडच्या पोलिस उपाधिक्षक राजश्री पाटील, कराड तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, कराडचे आरटीओ चैतन्य कणसे, सुपने मंडलाधिकारी प्रशांत कोळी, तांबवे गावच्या सरपंच निता पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक आण्णासाहेब पाटील, पाटण अर्बन बँकेचे उपाध्यक्ष धनंजय ताटे, माजी जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील, प्रा. तात्यासाहेब पाटील, डॉ. एम. एन. संदे यांच्यासह तांबवे परिसरातील विविध गावचे मान्यवर, ग्रामस्थ, विविध मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, तांबवे गावाने शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवुन चांगले काम केले आहे. या गावाला एेतिहासीक वारसाही आहे. या गावच्या प्रगतीमध्ये संगम गणेश मंडळानेही योगदान दिले आहे. त्या मंडळामार्फत वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. त्या मंडळाचा आदर्श जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील मंडळांनी घेण्यासारखा आहे. नदीचे प्रदुषण वाढत आहे. त्यातच आपण गणेशमुर्तींचे विसर्जन करतो. त्यामुळे तेच पाणी लोकांच्या पिण्यात आल्याने त्यामुळे आरोग्य बिघडते आणि नदीचे प्रदुषण वाढते. त्याचा विचार करुन सर्वांनी पर्यावरणपुरक विसर्जनावर भर द्या्वा. प्रत्येकाने नदीपात्रात मुर्तीचे विसर्जन न करता ते जलकुंडात करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्वांना केले.
यावेळी आदिवासी विभागाच्या अधिक्षकपदी निवड झाल्याबद्दल राजदिप पाटील, एमबीबीएस झाल्याबद्दल डॉ. सायली पाटील, महावितरणमध्ये अधिकारी झाल्याद्दल तेजल पाटील यांच्यासह विविध परिक्षेत यश मिळवलेले अथर्व पाटील, शिवराज पाटील, स्वराज मोहिते, मधुरा शिंदे,आराध्या पवार, प्रांजल चव्हाण, इशा पाटील, अनुष्का पवार, वैश्नवी कारंडे या विद्यार्थ्यांसह संत कृष्णतबुवा भजनी मंडळ, बापुनाना भजनी मंडळ, एकतारी भजनी मंडळ यांचा गौरव जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
पोलिस उपाधिक्षक श्रीमती पाटील, डॉ. संदे यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड.विजयसिंह पाटील यांनी प्रास्ताविक केले, अनिल बाबर, विकास पाटील, समीर नदाफ, सुरज पाटील, शरद पवार, विशाल पाटील, नितीन पवार, शंकर ताटे, मंगेश पाटील, गणेश देसाई यांनी स्वागत केले. हेमंत पवार यांनी आभार मानले.