
कराड : पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध दाम्पत्याकडील साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. शहरातील कोल्हापूर नाक्यावर गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत भिमराव धर्मे (वय ६५, रा. रेठरे बुद्रूक, ता. कराड) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेठरे बुद्रूक येथील चंद्रकांत धर्मे हे गुरुवारी सकाळी पत्नी भारती यांना सोबत घेऊन पुण्याला निघाले होते. त्यावेळी भारती यांच्या गळ्यात अडीच तोळ्याचे गंठण तसेच हातात पाच तोळ्याच्या पाटल्या होत्या. ते दोघेही खासगी वाहनाने कोल्हापूर नाक्यावर आले. तेथील केदारनाथ पेट्रोल पंपाजवळ वाहनातून उतरुन ते पायी चालत निघाले असताना ४५ ते ५० वयाच्या एका व्यक्तीने त्यांना हाक मारली. त्यामुळे चंद्रकांत धर्मे थांबले. संबंधिताने त्याठिकाणी येऊन आपण पोलीस असल्याचे सांगत स्वत: जवळील ओळखपत्र दाखवले. तसेच जवळच आमचे साहेब थांबले आहेत. तुम्ही त्यांना भेटा, असे धर्मे यांना सांगितले.
चंद्रकांत धर्मे व त्यांच्या पत्नी भारती हे दोघेजण काही अंतरावर थांबलेल्या व्यक्तीकडे गेल्या. त्यावेळी संबंधिताने ‘मी पोलीस आहे. या परिसरात साखळी चोर फिरत आहेत. तुम्ही तुमचे दागिने असे उघड्यावर घालून फिरू नका. आम्ही चोरांना पकडण्यासाठी साध्या गणवेशात उभे आहोत. तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा,’ असे धर्मे यांना सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून भारती यांनी त्यांचे गंठण व पाटल्या काढून पती चंद्रकांत यांच्याकडे दिल्या. त्यावेळी त्या अज्ञात व्यक्तीने तुमचे दागिने मी पिशवीत ठेवून देतो, असे म्हणत दागिने मागितले. मात्र, चंद्रकांत यांनी त्याला नकार देत स्वत:च पिशवीत दागिने ठेवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी त्यांच्या हाताला हिसडा मारून हातातील अडीच तोळ्याचे गंठण आणि पाच तोळ्याच्या सोन्याच्या दोन पाटल्या घेऊन ते दोघेजण दुचाकीवरून तेथून पसार झाले.
या प्रकारानंतर गोंधळलेल्या धर्मे दाम्पत्याने आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत चोरटे तेथून पसार झाले होते. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.