लग्न एकाबरोबर करायचे आणि संसार दुसऱ्याबरोबर करायचा हा घरंदाजपणा होतो का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत घराणेशाहीवरुन विरोधकांवर निशाणा साधला होता. तरुणांना राजकारणात येण्याचा सल्ला देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्या येण्याने घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात येईल, असं म्हटलं होतं.
त्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली होती. आता या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर शिवसंकल्प अभियानांतर्गत आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. निवडणूक एकाबरोबर लढवायची आणि सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन करायचे. म्हणजेच लग्न एकाबरोबर करायचे आणि संसार दुसऱ्याबरोबर करायचा हा घरंदाजपणा होतो का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
“पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुक्ताफळे उधळली. घराणेशाहीबद्दल ते बोलले. हा थेट सर्वसामान्य लोकांचा, तुमचा आमचा अपमान आहे. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते. पण हे मात्र घरगडी समजतात. तुच्छ, नोकर समजतात. म्हणून त्यांची ही गत झाली आहे. सर्व सोडून गेले आहेत. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडण्याची भाषा केली त्याच बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम त्यांनी केले. सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार मोडले. बाळासाहेब असते तर आता जोड्याने मारले असते. शिवसेनेमध्ये तुमचे काय योगदान आहे? आमच्यासारख्या फाटक्या लोकांनी रक्ताचे पाणी केले. शिवसेना वाढवली. आयत्या बिळावर नागोबा होण्याचे भाग्य तुम्हाला लाभले. बाळासाहेब म्हणायचे तुम्ही शिवसैनिक आहात म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे. पण हे म्हणतात, मी आहे म्हणून तुम्ही आहात. हे तुम्हाला मान्य आहे का?” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.