
कराड : कराड तालुक्यातील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा आणि शासनाच्या योजनांवर डल्ला मारत सरकारी तिजोरीला फसवणुकीचा घाव घालण्याच्या प्रकारांचा लवकरच मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या धान्याशी आणि शासकीय लाभांशी थेट संबंधित असलेल्या या विभागात काही संशयास्पद हालचाली आणि निर्णयांमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, या सर्व प्रकरणाचा धागा लवकरच उलगडण्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.
पुरवठा विभाग हा गरीब आणि सर्वसामान्यांच्या अन्नसुरक्षेशी जोडलेला अत्यंत संवेदनशील विभाग मानला जातो. मात्र कराड तहसील कार्यालयातील या विभागात काही काळापासून नियमांना हरताळ फासणे, फाईल्स जाणूनबुजून अडकवणे आणि संशयास्पद पद्धतीने निर्णय घेतले जाणे अशा प्रकारच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे “गरिबांच्या ताटातील घासावरच जर कुणी हात साफ करत असेल, तर हा अन्याय सहन करायचा किती दिवस?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित काही धक्कादायक कागदपत्रे आणि व्यवहार लवकरच समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, शासनाच्या योजनांमध्ये अनियमितता करून सरकारी निधीची अफरातफर झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास झाला तर अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता असून, काही जबाबदार अधिकारी आणि संबंधितांवर कारवाईची टांगती तलवार लटकण्याची शक्यता प्रशासन व राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शक तपास होऊन सत्य बाहेर यावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. शासनाच्या योजना या गरिबांच्या कल्याणासाठी असतात; मात्र त्या योजनांवरच कुणी गंडा घालण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा पर्दाफाश होणे हीच खरी लोकशाहीची ताकद असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

