
कराड : कराड शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तपासकौशल्याचा, तांत्रिक क्षमतेचा आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याच्या अद्वितीय क्षमतेचा प्रत्यय देत संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले यांच्या मृत्यूमागील थरारक सत्य जगासमोर आणले आहे. सुरुवातीला अपघाताचा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या या घटनेमागे प्रेमसंबंधातून रचलेले कटकारस्थान, सुपारी देऊन घडवून आणलेली हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
मणव (ता. कराड) येथील रहिवासी आणि जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मण श्रीरंग मंडले हे सुट्टीसाठी ठाणे येथून कराडकडे येत होते. दिनांक 6 जून 2026 रोजी पहाटे सुमारे 5.20 वाजण्याच्या सुमारास ते कोल्हापूर नाका, कराड येथे ट्रॅव्हल्समधून उतरले. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी सारिका मंडले हिला फोन करून आपण पायी घरी येत असल्याची माहिती दिली. मात्र त्याआधीच पहाटे 4 वाजल्यापासून सारिका मंडले या वारंवार पतीशी संपर्क साधून त्यांच्या हालचाली आणि लोकेशनची माहिती घेत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या तपासानुसार, हीच माहिती तिने आपला प्रियकर प्रथमेश प्रकाश थोरात याला पुरविली आणि याच माहितीच्या आधारे मृत्यूचा सापळा रचला गेला.
कार्वे येथील प्रथमेश थोरात आणि त्याचा साथीदार आकाश अशोक होनसुरे यांनी आधीच संपूर्ण नियोजन करून लक्ष्मण मंडले यांचा पाठलाग सुरू केला होता. शिंदे हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर लक्ष्मण मंडले पायी जात असताना आरोपींनी अल्टो कारने त्यांच्या पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत मंडले गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील बॅग आणि मोबाईल फोन घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. मात्र मंडले अद्याप जिवंत असल्याची शंका त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे काही वेळाने ते पुन्हा घटनास्थळी परतले आणि अत्यंत निर्दयीपणे त्यांना वाहनाखाली चिरडून जीवे ठार मारल्याचा धक्कादायक तपशील तपासातून समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या खळबळजनक प्रकरणाचा प्राथमिक उलगडा झाला असला तरी तपासाची व्याप्ती आता आणखी वाढविण्यात आली आहे. या हत्याकांडामागे आणखी कोणते सूत्रधार अथवा सहकारी आहेत का, याचा सखोल तपास कराड शहर पोलीस करीत आहेत. या गुन्ह्यासाठी नेमकी किती रकमेची सुपारी देण्यात आली होती, ती रक्कम कोणी दिली, त्या पैशांचा स्रोत काय होता, तसेच आर्थिक व्यवहार कोणत्या माध्यमातून करण्यात आले याचा तपशील पोलिसांकडून पडताळला जात आहे. याशिवाय या संपूर्ण कटामध्ये इतर कोणाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग होता का, आरोपींना कोणी मदत केली का, पुरावे नष्ट करण्यासाठी आणखी कोणाची मदत घेण्यात आली होती का, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात असून तपास यंत्रणांनी त्यादृष्टीने हालचाली वेगवान केल्या आहेत.
एक साधा अपघात म्हणून समोर आलेल्या या प्रकरणामागे एवढे भीषण कटकारस्थान दडलेले असेल, याची कल्पनाही कोणाला नव्हती. मात्र कराड शहर पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स, तांत्रिक विश्लेषण आणि फॉरेन्सिक पुरावे यांची सांगड घालत तपासाची चक्रे एवढ्या वेगाने फिरवली की अवघ्या काही तासांत संपूर्ण कटकारस्थान उघडे पडले. अपघाताच्या आड लपविण्याचा प्रयत्न केलेल्या खुनाचा मुखवटा फाडत पोलिसांनी आरोपींपर्यंत मजल मारली आणि त्यांना बेड्या ठोकल्या.
या संपूर्ण तपासाचे खरे शिल्पकार ठरले ते कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे. गुन्ह्याच्या तपासात बारकाई, तांत्रिक पुराव्यांचा अचूक वापर, घटनाक्रमातील विसंगती त्वरित ओळखण्याची क्षमता आणि गुन्हेगारांच्या मनोवृत्तीचा अचूक अंदाज घेण्याचे कौशल्य यामुळे हे प्रकरण अल्पावधीत उघडकीस आले. अपघात वाटणाऱ्या घटनेमागे खुनाचा वास ओळखून तपासाला योग्य दिशा देण्याची त्यांची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. तपासातील त्यांची दूरदृष्टी, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे कराड शहर पोलिसांचा लौकिक आणखी उंचावला आहे.
दत्तात्रय दराडे यांचे नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणे नव्हे, तर प्रत्येक तपशील स्वतः तपासणे, प्रत्येक धागा स्वतः पडताळणे आणि संपूर्ण पथकाला प्रेरित करत यशाच्या दिशेने घेऊन जाणे होय. त्यामुळेच आज कराड शहर पोलिसांची ही कामगिरी केवळ गुन्हा उघडकीस आणण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती राज्यातील तपास यंत्रणांसाठी एक आदर्श उदाहरण ठरत आहे. नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणारे आणि गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण करणारे अधिकारी म्हणून दत्तात्रय दराडे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
या यशामागे उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांचे भक्कम मार्गदर्शन आणि नेतृत्वही तितकेच महत्त्वाचे ठरले. कठीण आणि संवेदनशील तपासामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पूर्ण विश्वास ठेवत त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी देणे, त्यांच्या क्षमतेला वाव देणे आणि प्रत्येक टप्प्यावर आवश्यक पाठबळ उपलब्ध करून देणे ही त्यांची कार्यशैली या तपासातून प्रकर्षाने दिसून आली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्वच मोठी यशोगाथा घडवू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे राजश्री पाटील यांचे या प्रकरणातील योगदान होय.
मा. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम, दीपक वागवे आणि कराड शहर पोलिसांच्या संपूर्ण पथकाने केलेल्या अथक परिश्रमांमुळे हा खळबळजनक गुन्हा उघडकीस आला असून, कराड शहर पोलिसांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.



