
कराड : कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पूर्वजांच्या कुणबी असल्याच्या नोंदी सापडत आहेत. मात्र नावे समजत नसल्याने असलेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. राज्यात सर्वप्रथम असे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून मराठा समाज बांधवांना कुणबी दाखला काढताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी या कार्यालयातून प्रयत्न होणार आहेत.
मागील महिन्यात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत देत ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी कराड तालुक्यातील गावोगावी साखळी उपोषण सुरू आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना शुक्रवारी कराडमध्ये कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. तालुक्यातील मराठा समाज बांधवांना कुणबी दाखले काढताना अथवा आपल्या पूर्वजांचे नाव कुणबी म्हणून नोंद आहे का ? याची माहिती मिळवण्यासाठी हेलपाटे मारावी लागत आहेत. मराठा समाज बांधवांना होणारा त्रास कमी करणे, ज्या मराठा बांधवांचे पूर्वज कुणबी म्हणून नोंदवले गेले आहेत अशा मराठा बांधवांना कुणबी दाखले काढताना होणारा त्रास दूर करणे या हेतूने कराडमध्ये तहसील कार्यालय परिसरातील कराड अर्बन बँकेच्या तळभाग शाखेनजीक जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मराठा बांधवांना कुणबी दाखले काढण्यासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य केले जाणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी स्पष्ट केले आहे. तालुक्यात सापडल्या 11 हजाराहून अधिक नोंदी कराड तालुक्यात आजवर सुमारे अकरा हजारहून अधिक कुणबी नोंदी सापडले आहेत. यापैकी जवळपास चार हजार जणांच्या नोंदी मराठी भाषेत आहेत. ही सर्व नावे असलेली यादी कराड तालुका प्रशासनाकडून कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना देण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवांनी जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मोडी येणाऱ्यांनी सहकार्य केल्यास मानधन…
कराड तालुक्यात जवळपास सात हजाराहून अधिक जणांच्या नोंदी मोडी लिपीत असल्याचे समोर आले आहे. मोडी लिपी वाचता येणारा एकच व्यक्ती असून त्यांच्यावर कामाचा मोठा भार पडत आहे. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्यासाठी मोडी लिपी वाचता येणाऱ्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. अशा लोकांना योग्य ते मानधनही दिले जाईल असेही कराड तालुका मराठा क्रांती मोर्चा कडून जाहीर करण्यात आले आहे.