राजकियराज्यसातारा

‘सह्याद्रि’वर बाळासाहेब पाटील यांची एकहाती सत्ता

विरोधकांचा 21/0 ने धुव्वा ः तिरंगी लढतीचा विरोधकांना फटका

कराड : तिरंगी लढतीमुळे राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मोठा विजय मिळवत एक हाती सत्ता कायम ठेवली. विरोधी दोन्ही पॅनेलला सुमारे 8 हजारहून अधिकच्या मतांनी पराभावास सामोरे जावे लागले आहे. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनेलने 21/0 असा दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला धक्का बसला आहे. विरोधातील तिसरे पॅनेल सत्ताधाऱ्यांसमोर निष्क्रीय ठरले.

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यावेळी पहिल्यांदाच तिरंगी झाली. सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनेल, आमदार मनोजदादा घोरपडे व उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील स्व. यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्रि परिवर्तन पॅनेल तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वाखालील निवासराव थोरात पॅनेल प्रमुख असणारे यशवंतराव चव्हाण सह्याद्रि स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेल अशी तिरंगी लढत झाली होती. 21 जागेसाठी तिन्ही पॅनेलचे 61 उमेदवार व अपक्ष 9 असे 70 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामुळे सुरुवातीपासूनच मोठी चुरस पहायला मिळाली. आमदार मनोज घोरपडे यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. 4 ते 5 हजाराच्या मतांनी पॅनेल निवडून येईल असा विश्वासही त्यांनी जाहीर सभांमधून व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात सभासद मतदारांनी त्यांनी साथ दिली नाही. हे सभासद बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी ठाम राहिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.

सह्याद्रि कारखान्याचे कराड, सातारा, कोरेगाव, खटाव व कडेगाव अशा पाच तालुक्यात कार्यक्षेत्र असून 32205 सभासद कारखान्याचे मतदार आहेत. यापैकी 26081 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सहा गट व तीन आरक्षित प्रवर्गातून  एकूण 21 जागेसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी 99 मतदान केंद्रांवर मतपत्रिकेद्वारे मतदान झाले. मतमोजणी कराड येथील राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये रविवारी सकाळी 8 वाजता सुरू झाली. दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी घेण्यात आली. पहिल्या फेरीत 1 ते 50 केंद्रावरील मतांची मोजणी करण्यात आली तर दुसऱ्या फेरीत 51 ते 99 मतदान केंद्रावरील मते मोजण्यात आली. पहिल्या फेरीचा निकाल दुपारी दोनच्या दरम्यान जाहीर करण्यात आला. या फेरीत पी. डी. पाटील पॅनेलचे सर्व उमेदवार सुमारे 4 हजारांच्या मतांनी आघाडीवर राहिले. मतदारांचा हाच ट्रेंड कायम राहतो असा विश्वास व्यक्त करत पी. डी. पाटील पॅनेलच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधाळण करत जल्लोष करण्यास सुरुवात केली. निकालाचे कल लक्षात येताच बाळासाहेब पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली. बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील निवासस्थाना बाहेरही गावागावातील कार्यकर्ते जमा झाले. यावेळी विजयाच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

एक ते सहा ऊस उत्पादक गट व चार प्रवर्गात पी. डी. पाटील पॅनेल मतमोजणी सुरूवातीपासूनच आघाडीवर राहिले. एक ते 99 मतदान केंद्रामध्ये प्रामुख्याने तांबवे, सुपने, वारूंजी, केसे, कराड, कडेगाव, कडेपूर, खोडशी, वहागाव, चरेगाव, इंदोली, उंब्रज, वडोली भिकेश्वर आदी मोठ्या लोकसंखेचा गावांचा समोवश आहे. या सर्व गावातून पी. डी. पाटील पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी मतांची आघाडी घेतली. आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या उमेदवारांचा प्रभाव कोणत्याच केंद्रावर जाणवला नाही. तर तिसरे पॅनेल पूर्ण अपयशी ठरले.

निवडणूक प्रशासनाचे कौतुक
सहकारी साखर कारखाना निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणूक प्रशासनाने  नियोजन बद्ध पद्धतीने कामकाज पाहिले. तिरंगी लढत, उमेदवारांची मोठी संख्या, न्यायालयीन प्रक्रिया या सर्वच पातळ्यावर प्रशासन खरे उतरले. मतदाना दिवशी सर्व केंद्रावर योग्य पद्धतीने नियोजन झाले त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. मतमोजणीचे नियोजन ही नेटके करण्यात आले होते. कोठेही गडबड गोंधळ झाला नाही. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजयकुमार सुद्रिक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल देशमुख, अपर्णा यादव यांनी कामकाज पाहिले. यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close