
कराड : राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १९) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित केला असल्याची माहिती रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली.
शनिवारी दुपारी चार वाजता शामराव पाटील फळे, फुले, भाजीपाला मार्केटच्या मैदानावर पक्षप्रवेश कार्यक्रम होत असून यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री ना.मकरंद पाटील, खासदार नितीनकाका पाटील, फलटणचे आमदार सचीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा सोनाली पोळ, प्रदीप विधाते, विजयसिंह यादव, संजय देसाई, सीमा जाधव, राजेश पाटील, वाठारकर, श्रीनिवास शिंदे, सादिक इनामदार,जितेंद्र डुबल यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
उदयसिंह पाटील पुढे म्हणाले, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याकडून राजकारणाचे धडे घेवुन ज्येष्ठ नेते (कै.) उंडाळकर यांनी समाजातील सामान्य जनतेचे नेतृत्व करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम आयुष्याच्या अखेरपर्यत केले. कऱ्हाड दक्षिण मतदार संघाचे त्यांनी सलग ३५ वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करताना मतदार संघाचा त्यांनी चेहरा मोहरा बदलला. विशेषतः मतदार संघातील मूलभूत समस्या ची सोडवून करताना जलसिंचनाचा कराड दक्षिण पॅटर्न राबवून वारणेचे पाणी कृष्णा नदीला मिळवून पहिला नदी जोड प्रकल्प साकारला.तालुक्याबरोबर सातारा जिल्ह्यातील सामान्य जनतेला सत्तेशी दारे खुली करण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना कॉंग्रेस पक्षांतर्गतच संघर्ष करावा लागला. तरी ही त्यांनी राजकारणातील तत्व जोपासत सामान्य माणसाची नाळ शेवटपर्यंत सोडली नाही. त्याच्यानंतर राजकीय सामाजिक वारसा सर्व रयत संघटनेतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे चालवत आहोत. कऱ्हाड तालुक्यातील सामान्य माणसाचे काकांनी निर्माण केलेले प्राबल्य कायम ठेवण्यासाठी आपले प्रयत्न असून त्यास यश ही आले आहे. राज्याच्या राजकारणात सातत्याने बदल होत आहेत. सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता राज्यात आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ताचे तालुका जिल्ह्यात उभे केलेले संघटन त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना राजकीय ताकद मिळण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसच्या विचारांशी साधर्म्य असलेल्या आणि सत्तेतील पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा शनिवारी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी दुपारी चार वाजता येत असून कराड येथील भाजीपाला मार्केटच्या मैदानावर तालुक्यातील महिला, युवक व जनतेने बहुसंख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहन उंडाळकर यांनी शेवटी केले.