
सातारा : पर्यटन विभागाच्या वतीने २ ते ४ मे दरम्यान होत असलेल्या महापर्यटन उत्सवात सहभागी होत असलेल्या पर्यटकांना प्रवेशकर व वाहनतळ फी माफ करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी महाबळेश्वर येथे बोलताना दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे वरीष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंतराव हेडे, तहसिलदार तेजस्विनी पाटील, महाबळेश्वर व पाचगणी पोलिस स्टेशनचे श्री. सांडभोर व श्री. पवार, पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते
महाबळेश्वर या पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणावर पर्यटक यावेत यासाठी पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या संकल्पनेतुन व मंत्री ,मदत व पुनर्वसन, मकरंद जाधव पाटील यांचे मार्गदर्शनातून महाबळेश्वर येथे २ ते ४ मे या दरम्यान तीन दिवसीय महापर्यटन उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या पर्यटन उत्सव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या महापर्यटन उत्सवाची शासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. तब्बल २० ते २२ वर्षानी होत आहे. या उत्सवातील कार्यक्रमाचे सादरीकरणासाठी शहरातील प्रमुख पदाधिकारी व नागरीकांची एक बैठक प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या अध्यक्षतेखाली येथील मधुवनच्या सभागृहात अयोजित करण्यात आली होती. या वेळी त्यांनी टोल माफ करण्याबाबत प्रस्तावित केले असले बाबत माहीती दिली.
या वेळी उपस्थित नागरीकांशी संवाद साधताना राजेंद्र कचरे म्हणाले की, हा महापर्यटन उत्सव स्थानिक नागरीकांच्या सहकार्याशिवाय यशस्वी होणार नाही. या उत्सवाची संपुर्ण माहीती देणे व त्याबाबत नागरीकांची मते जाणुन घेणे व कार्यक्रमात आवश्यक ते बदल करण्यासाठी आजची ही बैठक घेण्यात आली आहे या बैठकीत नागरीकांनी केलेल्या प्रत्येक सूचनेचे आम्ही स्वागत करतो असे स्पष्ट करून कचरे यांनी शासनाची भुमिका स्पष्ट केली. महापर्यटन उत्सवाची माहीती सर्व दुर पोहचविण्यासाठी सर्वच मार्गाचा अवलंब करण्यात येणार आहे. रेडीओ टिव्ही वर्तमान पत्र या बरोबरच सोशल मिडीया यांचाही वापर करण्यात येणार आहे. टॅक्सी व लक्झरी बसेसवर जाहीरात करणारे स्टिकर लावण्यात येतील. शहरातील प्रत्येक प्रवेशव्दारावर मोठ मोठ्या कमानी उभारल्या जातील त्याचप्रमाणे मुंबई बंगलोर व मुंबई गोवा या महामार्गावर होर्डीग्ज लावले जातील. हॉटेलमधील स्वागत कक्षात उत्सवाची कार्यक्रम पत्रीका लावली जाईल. तीन दिवस आलेल्या पर्यटकांना एक कीट देण्यात येईल. या किट मध्ये काही वस्तु व माहीती पत्रक असेल अशी माहीती ई फॅक्टर या इव्हेंट कंपनीच्या वतीने अनिकेत सराफ यांनी नागरीकांना दिली. या शिवाय सकाळी विल्सन पॉईट येथे पहाटे योगा घेण्यात येईल या बरोबर तेथे बासरी व सतार वादनाचे कार्यक्रम सादर केले जातील, शहरात सायंकाळी कार्निव्हल परेड होईल. यामध्ये आपल्या संस्कृती बरोबर पाश्चिमात्य संस्कृतीचा मिलाफ पहावयास मिळणार आहे. वेण्णालेक येथे तरंगता बाजार भरविला जाणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी भव्य लेजर शो तसेच ड्रोन शो भरविण्यात येणार आहे. शहरातील बाजारपेठे बरोबरच काही पॉईटवर देखिल करमणुकीचे कार्यक्रम सादर केले जाणार आहे. तापोळा येथे जलक्रिडा तर भोसे येथे सहसी खेळ खेळण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. साहसी खेळामध्ये पॅराग्लायडीगसह हेलिकॉप्टर राईडचा देखिल समावेश करण्यात आला आहे. येथील माखरीया हायस्कुल मध्ये फुड फेस्टीव्हल अंतर्गत खादय पदार्थाचे स्टॉल लावण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या सर्वदुर प्रसिध्द असलेले खादय पदार्थाची येथे भरमार असणार आहे. पोलिस मैदानावर मोफत वाहनतळाची सोय करण्यात आली आहे. उत्तम योगदान देणारांना पुरस्कार देवुन सन्मानित केले जाणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. येथील गोल्फ मैदानावर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळा दुपारी होणार असुन त्या नंतर सलग तीन दिवस येथे सायंकाळी प्रसिध्द कलाकारांचे कार्यक्रम सादर केले जाणार आहे. या गोल्फ पैदानावर व भोसे येथे पंचतारांकित टेन्ट सिटी उभारण्यात येणार आहे, अशी माहीती या वेळी इव्हेन्ट कंपनीच्या वतीने देण्यात आली या वेळी झालेल्या चर्चेत नागरीकांनी देखिल अनेक सुचना केल्या. या सर्व सुचनांची नोंद प्रशासनाच्या वतीने करण्यात आली योग्य त्या सूचनांचा, विचार प्रशासन नक्की करेल, अशी ग्वाही या वेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रसेठ राजपुरे, माजी सभापती संजय गायकवाड, राजेश कुंभारदरे, किसनसेठ शिंदे ऍड. संजय जंगम , रविंद्र कुंभारदरे गिरीश नायडु गोपाळ लालवेग, सा डी वावळेकर, विजय भिलारे यांनी सहभाग घेतला या वेळी युसूफ शेख, रमेश पलोड, रमेश कौल, किसन खामकर, सुर्यकांत जाधव रूशी वायदंडे, सी डी हेवे आदी मान्यवरासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.