
कराड : प्रतिबंधित पान मसाल्यासह तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्या विक्रेते तसेच व्यापार्यांवर कारवाईचे धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. कराड पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे विशेष पथक तसेच कराड शहर पोलीस ठाण्याच्या पथकांकडून सोमवारी दिवसभर ही कारवाईची मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील काही विक्रेते तसेच व्यापार्यांकडे प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे विशेष पथक व कराड शहर पोलीस ठाण्यातील एक पथक तैनात करण्यात आले होते. या पथकांनी शहरातील कोल्हापूर नाका, पोपटभाई पेट्रोल पंप चौक, भेदा चौक, बसस्थानक परिसर, विजय दिवस चौक, कृष्णा नाका, कार्वेनाका यासह शहरातील विविध दुकानांवर छापा टाकला. पोलिसांनी तपासणी केली असता अनेक दुकानांमध्ये प्रतिबंधित पानमसाला व तंबाखू आढळून आली.
उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने याप्रकरणी सुमारे नऊ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. तसेच त्यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या पथकानेही आठ ते दहा दुकानांवर कारवाई करून मुद्देमाल जप्त केला असून संबंधित विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.