
कराड : जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी एकाला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. डी. बी. पतंगे यांनी गुरुवारी ही शिक्षा ठोठावली.
शरद दत्तात्रय वाघमारे (वय 30, रा. मनव, ता. कराड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
सरकार पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव येथील प्रथमेश उर्फ मंथन मधुकर आमणे या युवकाचा मनव येथील शरद वाघमारे याच्याशी शाब्दिक वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून 26 जानेवारी 2018 रोजी नांदगाव येथील बसथांब्याजवळ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शरद वाघमारे याने प्रथमेश उर्फ मंथन याच्या पोटावर तसेच हातावर चाकूने वार केला. त्यामध्ये प्रथमेश गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी शरद वाघमारे याला अटक करण्यात आले.
तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. के. साबळे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अॅड. आर. डी. परमार आणि एम. व्ही. कुलकर्णी यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्यावतीने अकरा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी शरद वाघमारे याला सात वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास आणखी एक वर्ष साधी कैद अशी शिक्षा सुनावली.