राज्यसातारा

भारताच्या राष्ट्रनिर्माणात शिव-समर्थ परंपरेचे अमूल्य योगदान : भैय्याजी जोशी

‘श्री शिवचरित्र’ व ‘श्री समर्थ चरित्र’ ग्रंथांचे प्रकाशन, सज्जनांना शक्तिशाली करण्याचे आवाहन

कराड : “भारत ही पुण्यभूमी, देवभूमी, पराक्रमी पुरुष आणि संतांची कर्मभूमी आहे. अनेक आक्रमणांतून व गुलामगिरीतून मार्ग काढत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या रूपाने ३५० वर्षांपूर्वी इतिहासाच्या सुवर्णपानाची सुरुवात झाली. या सुवर्णकाळाचे लेखन समर्थ रामदास स्वामींनी केले असून भारताच्या राष्ट्रनिर्माणात शिव-समर्थ परंपरेचे अमूल्य योगदान आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले.
येथील कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्यावतीने सुप्रसिद्ध विचारवंत कै. साने गुरुजी लिखित ‘हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवराय’ आणि ज्येष्ठ पत्रकार ज. सी. करंदीकर लिखित ‘श्री समर्थ चरित्र’ या ग्रंथांचे प्रकाशन भैय्याजी जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विशेष म्हणजे श्री शिवरायांचे कार्य भारतभर घरोघरी जावे, या उद्देशाने मराठीसह हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाषांमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथमहाराज कोटणीस होते. याप्रसंगी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, मंडळाचे कार्यवाह योगेशबुवा रामदासी, विचारवंत डॉ. अच्युत गोडबोले, कराड अर्बन बँकेचे कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, सीए दिलीप गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
“श्रीमंत योगी” ही चार गुणांची संगती सांगताना भैय्याजी जोशी म्हणाले, “ज्ञान, भक्ती, कर्म आणि साधना या चार अंगांनी समाजातील सज्जन व्यक्ती योगदान देतात. मात्र, या सर्वांचा संगम असलेलाच खरा योगी होतो. छत्रपती शिवाजी महाराज हे असेच एकमेकांमध्ये गुंफलेले चारही गुणांचे मूर्तिमंत रूप होते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी त्यांना ‘श्रीमंत योगी’ ही उपाधी दिली,”. समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना उद्देशून लिहिलेलं पत्र केवळ इतिहास नव्हे, तर एका समाजाला दिलेला आदर्शाचा आरसा आहे. त्यातील प्रत्येक शब्द हे ‘श्री शिवचरित्र’ या ग्रंथाचे मूर्त स्वरूप आहे,” भारत शक्तिशाली आहे, पण त्याची ही शक्ती संहारक नसून संरक्षक आहे. आज देश विविध क्षेत्रांत प्रगती करतो आहे. आपण त्याचे केवळ साक्षीदार न राहता सक्रिय सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.
विक्रमसिंह मोहिते म्हणाले, “शिवरायांना जिजाऊ आणि शहाजीराजांनी दिलेल्या धर्म संस्कारांच्या जोडीला वेद, पुराणे, स्मृती, रामायण, महाभारत यांचे गहन अध्ययन होते. त्या अभ्यासाचा खरा परिणाम म्हणजे त्यांची राज्यकारभारातील कृती. यातूनच ‘हिंदवी स्वराज्य’ अस्तित्वात आले.”
त्यांनी तळबीड येथील वीर हनुमान मंदिरात असलेल्या दुर्मिळ अंजनी मातेच्या मूर्तीचा उल्लेख करत ही मूर्ती अभ्यासासाठी महत्त्वाची असून त्यावर सखोल संशोधन व्हावे.”, असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक करताना योगेशबुवा रामदासी म्हणाले, “शौर्याचे तेज आणि भक्तीचे तेज एकत्र आले, तेव्हा शिवकालात अलौकिक इतिहास घडला. म्हणूनच शिवराय व समर्थ यांचे चरित्र प्रकाशित करण्यासाठी कराडनगरीची निवड करण्यात आली. कारण ही नगरी दोन नद्यांच्या प्रितीसंगमावर वसलेली आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र अलोने यांनी केले. तर प्रशांत आवले यांनी आभार मानले. यावेळी संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह विजय जोशी, जिल्हा सहसंघचालक शशिकांत फिरंगे, जिल्हा कार्यवाह वैभव डुबल यांच्यासह कराड व परिसरातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शक्ती व संस्कारांचा संगम
“ श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींचा उद्देश केवळ धार्मिक नव्हता. सज्जन समाज हा दुर्बल असू नये, त्यांच्या मनातही पराक्रमाची ज्वाला पेटावी, हेच समर्थांचे खरे ध्येय होते,” असे भैय्याजी जोशी यांनी सांगितले.
समर्थ भक्तांचा सन्मान
सातारा जिल्ह्यात धर्मप्रसार आणि सेवा कार्यात सक्रीय असलेल्या समर्थ भक्तांचा सन्मान भैय्याजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. कराड अर्बन बँकेच्यावतीने सुभाषराव जोशी आणि दिलीप गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सन्मानकार्य पार पाडले.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close