
कराड : येथील सोमवार पेठेत झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत कराड शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून साडेपाच लाख रूपये किमतीचे साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेने शुक्रवारी ही कारवाई केली.
श्रेयस गणेश शिंदे (वय 22, रा. सोमवार पेठ, कराड) व शाहिल सुतार (वय 21, रा. शास्त्रीनगर, मलकापूर) अशी याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सोमवार पेठेतील एका घरात कोणी नसताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरले होते. या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक भापकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे सुरू केला. तपासादरम्यान श्रेयस शिंदे व शाहिल सुतार या दोघांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेला सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अशोक भापकर, पोलिस उपनिरीक्षक सतीश आंदळकर, पोलीस नाईक सुजन जाधव, अनिल जाधव, संदीप कुंभार, शिवाजी काटे, मोईनस मोमिन, दिग्विजय सांळुके, संग्राम पाटील, अमोल देशमुख, शैलेश साळुंके, सोनाली पिसाळ यांनी ही कारवाई केली.