
कराड : बेकायदेशीररित्या जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडून पोलिसांनी दहा जर्सी जातीच्या गायींची सुटका केली. पुणे-बंगळूर महामार्गावरील नारायणवाडी-आटके टप्पा येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हमद मगतुमसाब हुसेन (रा. दावनगिरी, राज्य कर्नाटक) व लिंगेशा एस. गोपाळ (ता. जि. दावणगिरी, राज्य कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत ओम विजय शेरकर यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिमतपूर येथील ओम शेरकर हे गुरुवारी सकाळी कामानिमित्त कराडात आले होते. त्यावेळी कराडच्या आठवडी बाजारातून एका टेम्पोतून गायींची बेकारीशीरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी याबाबतची माहिती कराड ग्रामीण पोलिसांना दिली. त्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने संबंधित टेम्पोचा पाठलाग करून नारायणवाडी गावच्या हद्दीत आटके टप्पा येथे संबंधित टेम्पो थांबवला. टेम्पोची पाहणी केली असता हौद्यामध्ये जर्सी जातीच्या दहा गाय दाटीवाटीने कोंबल्याचे आढळून आले. त्या गाईंची चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना क्रूरपणे वागणूक दिल्याप्रकरणी तसेच बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबतची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.