
कराड : जम्मू-काश्मिरमधील पहेलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा कराडला विजय दिवस समारोह समितीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी पाकीस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. तसेच कृष्णा घाटावर जमलेल्या शेकडो नागरिकांनी मेणबत्ती प्रज्वलीत करून व मोबईलच्या टॉर्च लावत या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी ज्याप्रकारे निष्पाप पर्यटकांवर गोळया झाडल्या त्याचप्रमाणे त्या दहशतवाद्यांनाही ठेचून मारण्याची मागणी प्रत्येक भारतीयाकडून होत आहे. पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत असताना विजय दिवस समारोह समितीच्या वतीने रविवारी संध्याकाळी कराडच्या कृष्णा घाटावर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी हिंदू व मुस्लिम बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रगीत झाल्यानंतर ‘भारत माता की जय व वंदे मातरम’च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच पुष्प चक्र अर्पण करून व दोन मिनीटे स्तब्ध राहत मेणबत्ती प्रज्वलीत करून या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरीकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.