
कराड ः कार्वेनाका येथील लाईफकेअर लॅबोरेटरीमध्ये रुणांच्या रक्त, लघवी तसेच इतर नमुन्यांची चाचणी सुरू आहे. या लॅबोरेटरीचे मालक तंत्रज्ञ संतोष शिंगण रुग्णांच्या रक्त, लघवी तसेच इतर नमुन्यांची चाचणी करून अहवाल वितरीत करतात. सदर अहवालांवर स्कॅन केलेली डॉ. नागेश महामुनी (एम.डी. पॅथॉलॉजिस्ट) यांची स्वाक्षरी आहे. मात्र, तपासणी करताना डॉ. नागेश महामुनी त्याठिकाणी आले नसून त्यांची सही संबंधित अहवालावर कशी काय? लोकांच्या जीवाशी वा आरोग्याशी खेळणाऱ्या लॅबोरेटरीवर व डॉ. नागेश महामुनी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शरद गाडे यांनी कराड शहर पोलिस ठाण्यामध्ये केली आहे.
याबाबत कराड शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, सोमवार दि.16 ऑक्टोबर रोजी माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण चाचणी करण्यासाठी वरील लॅबमध्ये गेलो. रिपोर्ट तयार होईपर्यंत मी त्याच ठिकाणी थांबलो होतो. थोड्या अवधीनंतर माझा रिपोर्ट तयार झाला. त्या दरम्यान लॅबमध्ये कोणीही आले नाही की गेले नाही. तरीही माझ्या रिपोर्टवर डॉ. नागेश महामुनी (एम.डी. पॅथॉलॉजिस्ट) म्हणून स्कॅन केलेली स्वाक्षरी होती. डॉ. महामुनी हे शासकीय स्व. सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात सेवेत असतात. डॉ. महामुनी नसताना त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची रिपोर्टवर स्कॅन केलेली स्वाक्षरी कशी काय ? शासकीय सेवेत असताना खाजगी लॅबमधील रिपोर्टवर सही करणे व तशी सही वापरांसाठी अनुमती देणे कायद्याने गुन्हा आहे. वैद्यकीय व्यवसायाचा गैरवापर करुन लोकांच्या जीवांशी वा आरोग्याशी बेजबाबदारपणे खेळ करणाऱ्या डॉक्टरांवर योग्य कारवाई करावी असे तक्रारीत म्हटले आहे.
बोगस पॅथॉलॉजी लॅबवर आळा घालण्याची गरज
एम.डी.पॅथॉलॉजिस्ट यांनी स्वत: उपस्थितीत राहून चाचणी अहवाल तयार करणे. मग त्यावर सही करणे बंधनकारक आहे. हॉस्पिटल अंतर्गत असणाऱ्या लॅबोरेटरीसाठी हाच नियम लागू आहे.नोंदणीकृत लॅब पॅथॉलॉजिस्टच्या अनुपस्थितीत चाचण्या करणे व पॅथॉलॉजिस्टची सही वापरुन रिपोर्ट देणे. ही कायद्यातून काढलेली पळवाट आहे आणि तो गुन्हा आहे. तो बोगस डॉक्टर या सदरात मोडतो. लोकांच्या आरोग्याशी राजरोसपणे चाललेला जीवघेणा धंदा थांबला पाहिजे.शासनाने यांवर कडक निर्बंध घातले पाहिजे.
सर्व वैद्यकीय व्यवसायांची तपासणी करून अवैध वैद्यक व्यावसायिकावर कारवाई करण्याचे अधिकार व जबाबदारी बोगस डॉक्टर समितीची आहे.मा.जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी सर्व लॅबोरेटरीची तात्काळ तपासणी करून अवैध लॅब चालकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना द्यावेत. अवघ्या कराड तालुक्यात अनोंदणीकृत लॅबची संख्या 90 हून अधिक आहे. आणि अर्थनितीमुळे हॉस्पिटल अंतर्गत लॅबची संख्या वाढत आहे. यावर आळा घालण्याची नितांत गरज आहे. अन्यथा रुग्णांच्या आरोग्याशी निव्वळ खेळ ठरेल.
– शरद जगन्नाथ गाडे, कराड