
कराड : मालखेड तालुका कराड येथील कुटुंबांना सुमारे 30 वर्षानंतर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री जन मन योजनेअंतर्गत गुरुवार दिनांक 17 एप्रिल रोजी कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या हस्ते या शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. अनेक वर्षानंतर शिधापत्रिका मिळाल्याने मालखेड येथील लाभार्थी भारावून गेले.
मालखेड येथील संबंधित कुटुंबे हे कातकरी समाजातील आहेत. गेली तीस वर्षे ते शिधापत्रिकेपासून वंचित होते. संबंधित कुटुंबे शिधापत्रिकेपासून वंचित असल्याबाबत पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती साहीला नायकवडे यांना माहिती मिळताच त्यांनी संबंधित कुटुंबाशी संपर्क साधून त्यांना शिधापत्रिका देण्याबाबत तहसील कार्यालय कराड पुरवठा शाखेत बोलावून घेतले व तात्काळ शिधापत्रिका देणे बाबतची कार्यवाही केली.
तहसील कार्यालय कराड तालुका पुरवठा शाखा सातत्याने वंचित घटकांना शिधापत्रिका वितरित करण्याबाबत पुढाकार घेत आहे. शिधापत्रिका वितरणावेळी पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती साहीला नायकवडे व पुरवठा निरीक्षक सागर ठोंबरे उपस्थित होते.