तुमच्याकडे समस्यांचे समाधान नाही तर मग खोटे तरी बोलू नका
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर डागली तोफ

नागालँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत नागा लोकांसाठी काहीच केले नाही. 2015 मध्ये झालेल्या करारानुसार त्यांच्या समस्या सोडवल्या नाहीत. त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत ही अत्यंत शरमेची बाब आहे. तुमच्याकडे समस्यांचे समाधान नाही तर मग खोटे तरी बोलू नका, अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या आजच्या चौथ्या दिवसाची सुरुवात त्यांनी नागालँडच्या मोकोक्चुंग येथून केली. त्यावेळी त्यांनी तेथील नागरिकांना संबोधित केले.
नागा लोकांचा विश्वास जिंकल्याशिवाय, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केल्याशिवाय त्यांच्या समस्या सोडवता येणार नाही, असे सांगतानाच मोदींकडे जर या लोकांच्या समस्यांचे समाधान नव्हते तर मग त्यांनी खोटे बोलायला नको होते येथील लोकांना खोटी आश्वासने द्यायला नको होती, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. येथील लोकांच्या समस्या गंभीर आहे आणि त्यांचे समाधान व्हायलाच पाहिजे, असेही ते म्हणाले.
नागालँडमध्ये 1947 पासून बंडखोरी सुरू आहे. वर्षानुवर्षे असलेल्या समस्यांची सोडवणूक न झाल्यामुळे ही बंडखोरी सुरू झाली. 2015 मध्ये मोदी सरकारने नागा लोकांच्या समस्यांचे प्रश्नांचे निदान करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार करार करण्यात आला होता; परंतु गेल्या नऊ वर्षांत मोदी सरकारने काहीच केले नसून करारातील अटीशर्ती तसेच शांती कराराच्या दिशने कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही यात्रेत सहभागी होण्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र इंडिया आघाडीत सहभागी करून घ्या, तरच ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होईन, अशी अट त्यांनी काँग्रेससमोर ठेवली आहे. तसे पत्रही प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना पाठवले आहे.
भाजपा, आरएसएसने नागा संस्कृतीचा अवमान केला
भाजपा सरकार आणि आरएसएसने नागा लोकांची संस्कृती, भाषा, परंपरा यांचा अवमान केल्याचा आरोपही काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. त्याचबरोबर मणिपूरमध्ये इतक्या मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार होऊनही मोदी तिकडे एकदाही गेले नाहीत ही शरमेची बाब असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, नवी दिल्लीत राहुल गांधी हा तुमचा हक्काचा सैनिक आहे. तुमच्या कुठल्याही समस्या, प्रश्न असतील ते सांगा मी संसदेत मांडेन, असेही राहुल गांधी म्हणाले. तसेच ‘भारत जोडो न्याय यात्रा’ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नागालँडमध्ये येऊन राहणार असल्याचे तसेच येथील तरुणांशी चर्चा करणार असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.