तुम्ही निवडणुकीचा विचार करू नका. लोकांशी संपर्क वाढवा, कामे करत राहा
राज ठाकरे यांचा पदाधिकारी कार्यकर्त्यांना सल्ला

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक कुठल्याही क्षणी लागू शकते. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील आज दक्षिण मध्य मुंबईच्या मतदारसंघ दौऱ्यावर आहेत.
यावेळी राज ठाकरेंनीमनसे शाखांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा तुम्ही निवडणुकीचा विचार करू नका. लोकांशी संपर्क वाढवा, कामे करत राहा असा सल्ला देत लोकसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केले आहे.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, पुढील ३-४ दिवसांत लोकसभा निवडणूक लढवायची की नाही हे सांगतो, तुम्ही काम करत राहा. लोकांपर्यंत पोहचा. बुथनिहाय एका कार्यकर्त्याने २५०-३०० लोकांशी संपर्कात राहावे अशाप्रकारे सूचना दिल्या आहेत. त्यामुळे एकूणच लोकसभा निवडणुकीत मनसे स्वतंत्र लढणार की महायुतीत मनसेचा सहभाग होणार याबाबत पुढील काही दिवसांत स्पष्टता येणार आहे.
अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीवर सकारात्मक भाष्य केले. मनसेने घेतलेली व्यापक भूमिका आमच्याशी विसंगत नाही आहे. त्यांची क्षेत्रीय अस्मिता आम्हाला मान्य आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचे मुद्दे मांडले पाहिजे. सोबतच व्यापक भूमिका असावी असे आमचे मत होते. आज हिंदुत्वाची भूमिका मनसेने घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या व आमच्या भूमिकेत फार काही अंतर राहिलेले नाही. बाकी निवडणूकीत काय करायचे या गोष्टी तपशील व चर्चेच्या असतात. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होऊ शकतात असं फडणवीसांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले, त्यानंतर राज ठाकरे एका शाखेच्या उद्घाटनासाठी जात होते. त्यावेळी वाटेतच राज ठाकरेंचा ताफा १५ मिनिटे थांबला होता. सातपूर येथील ही घटना आहे. शाखेच्या उद्घाटनाला जाताना रस्त्यातच अचानक राज ठाकरेंचा ताफा थांबल्याने अनेक तर्कवितर्क लढवले गेले. तब्बल १५ मिनिटे हा ताफा तिथेच होता. राज ठाकरेंना एक महत्त्वाचा फोन आला होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता हा फोन कुणाचा आणि ताफा वाटेतच अचानक का थांबवण्यात आला हे मात्र गुलदस्त्यात आहे.