
कराड : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याकडे ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यातून, परराज्यातून येणाऱ्या ऊस तोडणी मजुरांकरिता सुरक्षेच्या दृष्टीने कारखान्याने रावबवलेले उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत ॲड. देवयानी कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
त्या सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या भेटी प्रसंगी बोलत होत्या.
याप्रसंगी ॲड.रिशिका अग्रवाल, कारखान्याच्या व्हा.चेअरमन लक्ष्मीताई गायकवाड, संचालिका शारदा पाटील, यशवंतनरच्या सरपंच सौ.सुमय्या मोमीन, कराड जिल्हा न्यायालय अधीक्षक आर.डी.भोपते, विधी स्वयंसेवक के.व्ही.जाधव, लेडी कॉन्स्टेबल विजया वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान त्यानी हॉस्पिटल, पाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था शैक्षणिक सुविधा आदींबाबत पाहणी करून, ऊसतोडणी महिला मजुरांशी प्रत्यक्ष भेटीद्वारे संवाद साधला व माहिती घेतली, दरम्यान दोन दिवसांपूर्वी प्रसूती झालेल्या ऊसतोडणी महिलेच्या खोपीवर भेट देऊन आरोग्य विषयी मिळालेल्या सोई सुविधांबाबतची माहिती घेतली व विचारपूस केली व त्या कुटुंबियांच्या आग्रहास्तव मुलाचे नामकरण त्यानी केले.
ॲड.देवयानी कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, साखर कारखान्यांसाठी व ऊस तोडणी मजुरांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजना प्रत्यक्षात राबवल्या जात आहेत का? तसेच कारखाना व मजुरांच्या काही समस्या आहेत का? याची माहिती घेण्यासाठी अनेक कारखान्यांना भेटी दिल्या आहेत, परंतू सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या भेटीदरम्यान आज वेगळे चित्र पहावयास मिळाले, कारखाना कार्यस्थळावर मुजरांसाठी असणारी आरोग्याची व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, राहण्याची व्यवस्था, शैक्षणिक सुविधा, जनावरांसाठी पिण्याचे पाणी, सामाजिक सुरक्षा याकडे कारखान्याने कटाक्षाने लक्ष दिले असून, कारखान्याने राबविलेले उपक्रम इतर कारखान्यांसाठी प्रेरणादायी आहेत.
कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत करून, कारखान्याची व स्थलांतर मजुरांचे शोषण टाळण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समुपदेशन समितीची नाहीती दिली.
याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, फायनान्शियल ॲडव्हायझर एच.टी. देसाई, जनरल मॅनेजर पी.आर.यादव, फायनान्स मॅनेजर जयेंद्र नाईक, शेती अधिकारी व्ही.बी.चव्हाण, डे. शेती अधिकारी नितीन साळुंखे, ऊस विकास अधिकारी एस.जी.चव्हाण, जनसंपर्क अधिकारी व्ही.जे.शेलार, लेबर ऑफिसर विकास चव्हाण, डे. चीफ अकाउंटंट बी.जी.कुंभार, वाहन विभाग प्रमुख मोहन पिसाळ, मनोज थोरात, कारखान्याचे कर्मचारी तसेच ऊसतोडणी मजूर उपस्थित होते.