राज्यसातारा

गरीब कुटुंबांच्या धान्यावरती कराड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा डल्ला.? (भाग चौथा)

कराड : कराड तालुक्यातील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागावर सध्या गंभीर संशयाची सावली पडू लागली असून गोरगरिबांच्या तोंडातील घासच काही अधिकाऱ्यांच्या लालसेपुढे गहाण पडत असल्याची संतापजनक चर्चा तालुकाभर जोर धरू लागली आहे. शासनाने अत्यंत गरीब, श्रमिक आणि हातावर पोट असलेल्या कुटुंबांच्या चुली पेटत्या राहाव्यात, त्यांच्या लेकरांच्या ताटात किमान दोन वेळचा घास पडावा या मानवी संवेदनांमधून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत धान्य पाठवले जाते. परंतु याच धान्यावर काही बेजबाबदार अधिकाऱ्यांनी डोळा ठेवला असल्याचे आरोप समोर येत असून ही बाब केवळ प्रशासकीय चूक नसून सामाजिक आणि नैतिक अधःपतनाचे लक्षण मानली जात आहे.

धान्य हे केवळ सरकारी माल नसते; ते हजारो गरीब कुटुंबांच्या आशेचे, जगण्याचे आणि भुकेशी सुरू असलेल्या त्यांच्या रोजच्या संघर्षाचे प्रतीक असते. अशा परिस्थितीत जर या धान्याच्या प्रवाहातच गैरप्रकार होत असतील, तर तो प्रकार गोरगरिबांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्यासारखा असल्याची तीव्र भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे. शासनाकडून तालुक्यासाठी येणारे धान्य प्रत्यक्षात किती प्रमाणात गोदामात दाखल होते, ते दुकानदारांना कोणत्या पद्धतीने वितरित केले जाते आणि त्या धान्याचा शेवटचा हिशेब कुठे लुप्त होतो, याबाबत अनेक प्रश्न उभे राहू लागले आहेत.

पुरवठा व्यवस्थेतील पारदर्शकता हा लोकशाही व्यवस्थेचा कणा मानला जातो. मात्र जर या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेले अधिकारीच संशयाच्या भोवऱ्यात सापडले, तर त्या व्यवस्थेवरील विश्वास ढासळणे स्वाभाविक आहे. गरीबांच्या पोटाशी संबंधित असलेल्या या योजनेमध्ये जर कुणी स्वार्थासाठी हात घातला असेल, तर तो केवळ भ्रष्टाचाराचा विषय राहत नाही, तर तो मानवी संवेदनांवर घाला घालणारा अमानुष प्रकार ठरतो.

तालुक्यातील अनेक जाणकारांच्या मते, शासनाकडून येणाऱ्या धान्याचा प्रवास गोदामापासून ते रेशन दुकानापर्यंत हा कागदोपत्री जितका स्पष्ट दिसतो, तितकाच प्रत्यक्षात धूसर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेतील प्रत्येक टप्प्याचा उलगडा पुराव्यानिशी लवकरच केला जाणार असल्याची चर्चा सध्या वेगाने पसरत आहे. या साखळीत कोणकोणते अधिकारी, कर्मचारी किंवा इतर घटक सामील आहेत, कोणाचा किती वाटा आहे, याबाबत विविध स्तरांवर कुजबुज सुरू झाली आहे.

गोरगरिबांच्या आयुष्याशी निगडित असलेल्या या प्रश्नाकडे केवळ प्रशासनिक चौकटीतून पाहणे पुरेसे नाही. हा प्रश्न सामाजिक बांधिलकीचा, नैतिक जबाबदारीचा आणि शासनव्यवस्थेवरील विश्वासाचा आहे. त्यामुळे जर या प्रकरणामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याचा किंवा कर्मचाऱ्याचा सहभाग आढळून आला, तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता नागरिकांमधून ठामपणे पुढे येत आहे.

कराड तालुक्यातील सामान्य जनतेला एकच अपेक्षा आहे गरीबांच्या ताटातील घास हा कुणाच्याही स्वार्थासाठी लुटला जाऊ नये. शासनाने दिलेले धान्य हे खऱ्या अर्थाने गरजूंना मिळावे, हीच लोकशाही व्यवस्थेची खरी परीक्षा आहे. आता या प्रकरणाचा उलगडा होताना सत्य बाहेर येईल का, आणि गोरगरिबांच्या न्यायासाठी जबाबदार यंत्रणा किती ठामपणे उभी राहते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close