
कराड : विहिरीचे काम करणाऱ्या मजुराने झोपताना उशाखाली ठेवलेली ५० हजाराची रोकड चोरट्याने लंपास केली. करवडी, ता. कराड येथे रविवारी पहाटे ही घटना घडली.
याबाबत प्रकाश मारुती शिंदे (रा. वहागाव, ता. कराड) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वहागाव येथील प्रकाश शिंदे हे करवडी येथे विहिरीचे काम करण्यासाठी मुक्कामी राहिले आहेत. त्याठिकाणी ते मुकादम म्हणून काम करतात. विहिरीचे काम पूर्ण करण्यासाठी दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यापैकी ५० हजार रुपये विहीर मालकांनी प्रकाश शिंदे यांना शनिवारी सायंकाळी दिले होते. ही रक्कम प्रकाश शिंदे यांनी एका पिशवीत ठेवली. रात्री झोपताना त्यांनी ती पिशवी आपल्या उशाखाली ठेवली होती. विहिरीजवळ असलेल्या खोपीमध्ये ते आणि त्यांची पत्नी दोघेजण झोपले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास प्रकाश शिंदे यांना जाग आली. त्यांनी उशाखाली तपासले असता पैसे असलेली पिशवी त्याठिकाणी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी पत्नीला उठवून खोपीत सर्वत्र शोध घेतला. मात्र, पैशाची पिशवी आणि मोबाईल त्यांना सापडला नाही. चोरट्याने पैसे आणि मोबाईल लंपास केल्याची खात्री झाल्यानंतर प्रकाश शिंदे यांनी याबाबतची फिर्याद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.