
कोल्हापूर : विदर्भ, मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
द्राक्षे, कापूस, केळी, डाळिंब, भाजीपालासह इतर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफीसह नुकसानभरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
राज्यात झालेल्या या नुकसानीमध्ये सर्वाधिक फटका द्राक्ष व केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, या शेतकऱ्यांचे भांडवली नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. द्राक्ष व केळी पिकासाठीचा एकरी उत्पादन खर्च लाखो रूपयापर्यंत गेलेला आहे. हातातोंडाशी आलेले पीक जमिनदोस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. याकरिता राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून संबधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने पाहणी करून राज्य सरकारकडून प्रस्ताव सादर करून केंद्र सरकारने तातडीचे मदत करण्याची मागणी केंद्रीय मंत्री शहा यांच्याकडे केली आहे. भांडवली नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने कर्जाचा बोजा वाढल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांना आधार देणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारने तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या मदतीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे.