राज्यसातारा

आमदार अतुल भोसले यांनी कापिलच्या रस्त्याच्या कामाला न्याय द्यावा, नागरिकांची मागणी (भाग एकविसावा)

कराड : कराड दक्षिणच्या विकासासाठी अहोरात्र झटणारा नेता, जनतेच्या वेदना स्वतःच्या समजून घेणारे आमदार अतुल भोसले यांच्या मनातील जिव्हाळा आणि तळमळ आज पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. रेठरे खुर्द ते कार्वे नाका प्रजिमा ८१ या रस्त्यासाठी त्यांनी मंजूर करून दिलेला तब्बल तीन कोटी ५० लाखांचा निधी हा केवळ आर्थिक तरतूद नसून, कापिलकरांच्या सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मान्य जीवनाचा त्यांनी घेतलेला ध्यास आहे. मात्र, या पवित्र हेतूला हरताळ फासणारे काम पाहून नागरिकांच्या भावना दुखावल्या असून, आमदार भोसले यांच्या प्रामाणिक प्रयत्नांवरच घाला घातल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.

स्थानिकांनी मांडलेल्या तक्रारींमधून समोर येणारे वास्तव धक्कादायक आहे. ज्या कामामध्ये आमदार अतुल भोसले यांनी दर्जा आणि पारदर्शकतेचा आग्रह धरला, त्याच कामात कॉन्ट्रॅक्टदार आणि अधिकाऱ्यांनी बेफिकिरीची परिसीमा गाठल्याचे दिसून येते. बंदिस्त पाईपलाईनचे चेंबर्स थेट डांबरी रस्त्याखाली गाडून टाकणे ही केवळ तांत्रिक चूक नसून, जनतेच्या भविष्यासोबत खेळण्यासारखी बाब आहे. कापिलकरांच्या हितासाठी झटणाऱ्या आमदार भोसले यांच्या विश्वासाला तडा देणारी ही कृती असल्याची खंत नागरिक उघडपणे व्यक्त करत आहेत.

याहूनही गंभीर बाब म्हणजे, पूर्वीचा डांबरी रस्ता उकरून तोच अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आला आहे. नागरिकांना रोजच्या प्रवासात होणाऱ्या हालअपेष्टा पाहता, “आपल्या लोकांसाठी सर्वस्व झोकून देणाऱ्या आमदार भोसले यांना हे चित्र मान्यच होणार नाही,” असा विश्वास गावकऱ्यांच्या मनात आहे. मंजूर आराखड्याप्रमाणे काम न करता वेगळ्याच ठिकाणी काम केल्याच्या तक्रारींमुळे संपूर्ण प्रक्रियेवर संशय निर्माण झाला असून, आमदार भोसले यांच्या विकासदृष्टीला जाणीवपूर्वक धक्का दिला गेला आहे, अशी भावना अधिक तीव्र होत आहे.

कापिलच्या जनतेचा आवाज आता केवळ तक्रारींपर्यंत मर्यादित राहिलेला नाही, तर तो भावनिक आक्रोशात परिवर्तित झाला आहे. “जनतेच्या हितासाठी धडपडणाऱ्या आमदार अतुल भोसले यांनी स्वतः या कामाची पाहणी करून सत्य बाहेर आणावे,” अशी सर्वांची एकमुखी मागणी आहे. त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आजही तितकाच दृढ असून, ते या अन्यायाला वाचा फोडतील आणि दोषींवर कठोर कारवाई करतील, अशी आशा प्रत्येकाच्या मनात आहे.

कापिलचा हा प्रश्न आता केवळ एका रस्त्याचा राहिलेला नाही; तो जनतेच्या भावनांचा, विश्वासाचा आणि आमदार अतुल भोसले यांच्या जनतेप्रती असलेल्या अपार प्रेमाचा कस पाहणारा क्षण ठरला आहे. अपूर्ण राहिलेले काम पूर्णत्वास नेऊन, कापिलकरांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर अधिक ठामपणे येऊन ठेपली आहे, आणि जनतेला खात्री आहे जनतेसाठी जगणारा नेता त्यांच्या वेदनांकडे कधीच दुर्लक्ष करणार नाही.

पुढील भागात – एखाद्या रस्त्यावरती काम झाल्यानंतर त्या रस्त्यावरती नवीन फंड पडण्यासाठी कितीतरी वर्षे लागतात?

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close