ताज्या बातम्याराजकियराज्य

मी जड अंत:करणाने पक्ष बदलला, माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी प्रचंड दबाव टाकला : रवींद्र वायकर

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले आणि उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार झालेले रविंद्र वायकर यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. ठाकरे गटात असताना मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले.

ईडीची कारवाई झाली. तेव्हा जेलमध्ये जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय माझ्याकडे होते. पत्नीचे नावही गोवले गेले, यामुळे पक्षांतर करण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता असा खुलासा वायकर यांनी केला आहे.

वायकर यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशावेळी ठाकरे गटानेही हा दावा केला होता. आता वायकर यांनी एक वृत्तपत्रालाच ही मुलाखत दिल्याने मुंबईत शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. वायकर हे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत.

मी जड अंत:करणाने पक्ष बदलला. माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी प्रचंड दबाव टाकला गेला होता. माझ्या पत्नीचेही नाव यात गोवले गेले होते. नियतीने अशी वेळ कुणावरही आणू नये, अशा शब्दांत वायकर यांनी ठाकरे गट सोडल्याबद्दल वाईट वाटत असल्याचे कबुल केले.

बाळासाहेब ठाकरे असल्यापासून माझ्या खांद्यावर शिवधनुष्य आहे. 50 वर्ष एक शिवसैनिक म्हणून काम केल्यानंतर मला ठाकरे घराण्याची साथ सोडावी लागली. एखादी व्यक्ती जशी कुटुंबाला पोरकी होते, तशीच माझी अवस्था झालेली. सर्वोच्च न्यायालयानेच मला क्लिनचीट दिली आहे. पण माझे प्रकरण राजकीय असल्याने माझ्यावर दबाव आणण्यात आल्याचा आरोप वायकर यांनी केला. वायकर यांच्या खुलाशामुळे मुंबईत महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close