
कराड : सध्याच्या सरकारचं शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे. पवित्र पोर्टल बाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. जुन्या पेन्शन योजनेबाबत अनेक मुद्दे आहेत. शिक्षकांच्या सर्व प्रश्नांकडे सरकार जाणून-बुजून दुर्लक्ष करताना दिसत आहे. काँग्रेस शासित राज्यात ज्याप्रमाणे जुन्या पेन्शन चा निर्णय मार्गी लावला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आमचं महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर जुन्या पेन्शन योजनेबाबत तसेच पवित्र पोर्टल बाबत योग्य निर्णय ठामपणे घेईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे सातारा जिल्ह्यातील 300 शाळांना तर कराड तालुक्यातील 150 शाळांना शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून प्रिंटर, स्मार्ट टीव्ही, संगणक आणि शैक्षणिक साहित्याचे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. उदयसिंह पाटील, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलवडे, आर. वाय. जाधव, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, शारीरिक शिक्षक संघटना उपाध्यक्ष महेंद्र भोसले, मलकापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार यांच्यासह 750 हून अधिक शाळांचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले , आ.जयंत असगावकर सरांनी आपली प्रतिज्ञा खरी केली. त्यांनी आपला आमदारकीचा फंड फक्त शैक्षणिक साहित्य देण्यासाठीच वापरला. संगणक साक्षरता अंत्यत गरजेचे आहे. AI तंत्रज्ञानामुळे अनेक रोजगार नष्ट होतील. शिक्षण क्षेत्रावर गदा येईल. संगणक क्षेत्रात अनेक अमुलाग्र बदल होणार आहेत. संगणक क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली आहे. सध्या भारतात एकही काँम्पुटर चीफ तयार करणारी कंपनी नाही. एआय तंत्रज्ञानात आपण मागे पडून चालणार नाही. तंत्रज्ञानातील बदलाच्या आव्हानला सामोरे जावेच लागेल. संगणक साक्षरतेचे फायदे आणि आव्हान आपण बघितले पाहिजे. दरडोई उत्पन्नात पहिल्या क्रमांकावर असलेले महाराष्ट्र राज्य आज 11 व़्या स्थानावर घसरले आहे. राजकारणामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी दहा वर्ष उशिर झाला.
आ. जयंत आसगावकर म्हणाले, मी शिक्षक आमदार असल्याने रस्त्यासाठी किंवा गटारांसाठी कोणताही एक रुपया निधी मी दिला नाही. मात्र सर्व फंड शाळा साहित्य देण्यासाठी वापरला. माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या काळात शैक्षणिक दर्जा कसा वाढवावा. अनेक योजना राबवता आल्या. फक्त एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल अशा पद्धतीने मी काम करत आलो आहे. शिक्षकांनी मला भेटण्यापेक्षा मला फोनवरून काम सांगावे ते करण्यासाठी मी तत्पर असेन.
कराड दक्षिण मतदार संघातील तब्बल 70 शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रिंटर, स्मार्ट टीव्ही, संगणक यासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा हे मुख्यमंत्री असताना जिल्ह्यातील अनेक शाळाना कम्प्युटर लॅब देण्यात आल्याचे यावेळी आवर्जून शिक्षकांनी सांगण्यात आले.