सांगली तहसीलदार रंजना उंबरहंडें त्यांच्यावरती कलम १५५ प्रकरणात निलंबनाची कारवाई, मग कराडच्या कल्पना ढवळेंना अभय का? कलम १५० व १५५ चे शंभरच्या आसपास संशयास्पद आदेश; पूर्वीच्या चौकशी समितीला हे आदेश दिसले नाहीत का? दिसले असतील तर कारवाई का प्रस्तावित केली नाही? चौकशी समितीची भूमिकाही आता संशयाच्या भोवऱ्यात; स्वतंत्र तक्रार दाखल करण्याची गणेश पवार यांची तयारी!
विश्व सिटी न्यूज विशेष वृत्तमालिका भाग - 139 वा

कराड : कराडच्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांच्या कार्यकाळातील कलम १५० व १५५ अंतर्गत देण्यात आलेल्या आदेशांचा विषय आता अत्यंत गंभीर बनला आहे. त्यांच्या कार्यकाळात सुमारे शंभरच्या आसपास प्रकरणांमध्ये चुकीच्या पद्धतीने निकाल देण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारदार गणेश पवार यांनी केला आहे. या प्रकरणांच्या अनुषंगाने संबंधित आदेशांच्या प्रती, कागदपत्रे आणि पुरावे जोडून जिल्हाधिकारी सातारा, विभागीय आयुक्त पुणे, मंत्रालयातील संबंधित सचिव, मुख्य सचिव आणि महसूल मंत्री यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने तसेच आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून विभागीय आयुक्तांना कराड तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या कार्यकाळातील कलम १५० व १५५ अंतर्गत दिलेल्या आदेशांची चौकशी करून स्वयं स्पष्ट अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, आता केवळ चौकशीचा अहवाल मागविण्यापुरतेच प्रशासन थांबणार की संबंधित अधिकाऱ्यांच्या कथित चुकीच्या कामकाजाची जबाबदारी निश्चित करून निलंबन आणि खातेनिहाय चौकशीची कारवाई करणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, सांगलीच्या रंजना उंबरहंडे यांच्यावर कलम १५५ च्या अनुषंगाने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा दाखला आता कराड प्रकरणात पुढे येत आहे. कलम १५५ च्या कथित गैरवापराच्या प्रकरणात सांगलीतील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते, तर कराडमध्ये कलम १५० व १५५ अंतर्गत सुमारे शंभरच्या आसपास संशयास्पद आदेश दिल्याचे पुरावे तक्रारदाराकडे उपलब्ध असल्याचा दावा असताना कल्पना ढवळे यांच्याबाबत प्रशासन वेगळी भूमिका का घेत आहे? सांगली आणि कराडमधील प्रकरणांसाठी वेगवेगळे निकष लावले जाणार आहेत का? संबंधित आदेशांची सखोल तपासणी करून प्रथमदर्शनी गंभीर अनियमितता आढळल्यास कल्पना ढवळे यांना तत्काळ निलंबित करून खातेनिहाय चौकशी का सुरू करण्यात येऊ नये? असा थेट सवाल तक्रारदार गणेश पवार यांनी उपस्थित केला आहे.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा आणि आता नव्याने चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे, तक्रारदार गणेश पवार यांनी सध्याची लेखी तक्रार दाखल करण्यापूर्वीच कराड तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या कार्यकाळातील कलम १५० व १५५ अंतर्गत देण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने एका चौकशी समितीमार्फत तपासणी करण्यात आली होती. मात्र, या पूर्वीच्या चौकशीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीचे कामकाज केले नसल्याचा अहवाल दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता या चौकशी समितीच्या तपासणी प्रक्रियेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या कार्यकाळात सुमारे शंभरच्या आसपास चुकीचे निर्णय दिल्याचे आरोप आणि त्यासंदर्भातील आदेश उपलब्ध असतील, तर पूर्वीच्या चौकशी समितीने या सर्व प्रकरणांची तपासणी केली होती का? केली असेल तर या आदेशांमधील कथित चुकीचे कामकाज समितीच्या निदर्शनास आले नाही का? की संबंधित आदेश आणि त्यातील त्रुटी जाणूनबुजून दुर्लक्षित करण्यात आल्या? हा आता सर्वांत महत्त्वाचा प्रश्न बनला आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, पूर्वीच्या चौकशी समितीला या प्रकरणांतील कथित चुकीचे आदेश आणि अनियमितता निदर्शनास आली असेल, तर संबंधित तहसीलदारांविरुद्ध कोणती कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती? निलंबन, खातेनिहाय चौकशी किंवा अन्य कोणती शिस्तभंगाची कारवाई सुचविण्यात आली होती का? जर कोणतीही कारवाई प्रस्तावित करण्यात आली नसेल, तर त्यामागचे कारण काय होते? आणि संबंधित समितीने वरिष्ठ कार्यालयाकडे नेमका कोणत्या निष्कर्षाचा अहवाल सादर केला होता? सर्व आदेश योग्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता का? की काही त्रुटी आढळूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. कारण सध्याच्या तक्रारीमध्ये तक्रारदाराकडे उपलब्ध असलेले अनेक आदेश, त्यातील कथित त्रुटी आणि संबंधित कागदपत्रांचे पुरावे जोडण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मग पूर्वीच्या चौकशी समितीसमोर हेच पुरावे उपलब्ध होते का? उपलब्ध होते तर त्यांची दखल का घेतली गेली नाही? आणि उपलब्ध नव्हते तर चौकशी समितीने मूळ अभिलेखांची कितपत सखोल तपासणी केली होती?
आता या प्रकरणात आणखी एक गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. पूर्वीच्या चौकशी समितीने संबंधित प्रकरणांची केवळ वरवर तपासणी करून अहवाल सादर केला होता का? मूळ आदेश, फेरफार नोंदी, अर्जदारांचे अर्ज, संबंधित पक्षकारांच्या हरकती, सुनावणीची कागदपत्रे आणि अंतिम निकाल यांची स्वतंत्रपणे पडताळणी करण्यात आली होती का? की संबंधित अधिकाऱ्यांना दोषमुक्त करणारा अहवाल तयार करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला? चौकशी प्रक्रियेत कोणाचा दबाव किंवा हस्तक्षेप होता का? कथित आर्थिक तडजोड किंवा अधिकाऱ्यांना वाचविण्याचा काही प्रयत्न झाला होता का? असे प्रश्न उपस्थित होत असून, हे आरोप सिद्ध झालेले नसले तरी त्यांची निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. विशेष म्हणजे, चौकशी समितीने दिलेल्या निष्कर्षाचा आधार, तपासणी केलेल्या प्रकरणांची संख्या, तपासलेल्या मूळ कागदपत्रांची यादी आणि कारवाई प्रस्तावित केली असल्यास त्यासंबंधीचे अभिलेख सार्वजनिक तपासणीच्या कक्षेत आणणे आवश्यक आहे.
तक्रारदार गणेश पवार यांनी आता या प्रकरणात केवळ तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या कामकाजापुरती तक्रार मर्यादित न ठेवता, यापूर्वी चौकशी करणाऱ्या समितीतील संबंधित अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासण्याची भूमिका घेतली आहे. सुमारे शंभर प्रकरणांचे आदेश आणि त्यासंबंधीचे पुरावे उपलब्ध असताना पूर्वीच्या चौकशी समितीला हे कथित चुकीचे निर्णय दिसले नाहीत का? दिसले असतील तर कारवाईची शिफारस का केली नाही? आणि कारवाईची शिफारस केली नसेल तर वरिष्ठ कार्यालयाला कोणत्या आधारावर अहवाल सादर केला? या सर्व बाबींची उत्तरे मिळविण्यासाठी संबंधित चौकशी समितीतील अधिकाऱ्यांविरुद्धही स्वतंत्र लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी गणेश पवार यांनी केली आहे. त्यामुळे आता तहसीलदारांच्या आदेशांबरोबरच पूर्वीच्या चौकशी प्रक्रियेचीही स्वतंत्रपणे पडताळणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून आता हा प्रश्न थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे. तक्रारदार गणेश पवार यांनी तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या कार्यकाळातील कलम १५० व १५५ अंतर्गत दिलेल्या संशयास्पद आदेशांची निष्पक्ष चौकशी, संबंधित अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन, खातेनिहाय चौकशी आणि पूर्वीच्या चौकशी करण्याची मागणी केली आहे. सांगलीतील तहसीलदार रंजना उंबरहंडे यांच्यावरील कलम १५५ प्रकरणातील निलंबनाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कराडच्या प्रकरणात प्रशासन कोणता निर्णय घेणार? पूर्वीच्या चौकशी समितीने सुमारे शंभर प्रकरणांतील कथित चुकीचे आदेश तपासले होते की नाही? तपासले असतील तर कारवाई का प्रस्तावित केली नाही? आणि आता मंत्रालयाच्या निर्देशानुसार होणाऱ्या चौकशीत या सर्व बाबींचा खुलासा होणार का? की पुन्हा एकदा संबंधित अधिकाऱ्यांना अभय मिळणार? हे प्रश्न आता महसूल विभागासमोर उभे ठाकले आहेत. तक्रारीवरील ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका तक्रारदार गणेश पवार यांनी घेतली असून, या प्रकरणात आता तहसीलदारांच्या कामकाजाबरोबरच पूर्वीच्या चौकशी समितीच्या भूमिकेचाही हिशेब मागितला जाणार आहे.
पुढील 3.30 च्या भागात – तहसीलदार कल्पना ढवळे यांचे मंत्रालयातील महसूल विभागातील नातेवाईक हे कल्पना ढवळे यांच्या वरती कारवाईसाठी पुढाकार घेणार की चौकशीला सामोरे जाणार



