नऊ तक्रारींनी प्रशासनाचे धाबे दणाणले? उपसचिव प्रमोद पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे निर्देश; भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचविणाऱ्यांचीही आता खैर नाही! प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी आणि त्यांच्या पीए यांची माहिती आंदोलकांकडून संकलित? निधी, कथित कमिशन व्यवहार आणि दबावाच्या राजकारणाचा लवकरच पर्दाफाश करण्याचा दावा? अहवाल आल्यानंतर उच्च न्यायालयात रिट याचिकेची तयारी!
विश्व सिटी न्यूज विशेष वृत्तमालिका भाग - 137 वा

कराड : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे उपसचिव प्रमोद पाटील यांनी आंदोलक श्री. गणेश पवार यांनी शासनाकडे सादर केलेल्या नऊ तक्रार अर्जांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सातारा यांच्याशी अधिकृत पत्रव्यवहार केला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती वैशाली राजमाने, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेल्या या तक्रारी आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्या आहेत. तक्रारींमध्ये नमूद केलेल्या प्रत्येक मुद्द्याची वस्तुस्थिती तपासून, आवश्यक शासकीय अभिलेखांची पडताळणी करून सखोल चौकशी करावी, चौकशीअंती नियमानुसार पुढील कार्यवाही करावी आणि वस्तुस्थितीदर्शक व स्वयं स्पष्ट अहवाल आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ शासनास सादर करावा, असे स्पष्ट निर्देश उपसचिवांनी दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनातील कोणत्या अधिकाऱ्याची भूमिका काय होती, कोणत्या स्तरावर निर्णय झाले आणि तक्रारींमधील आरोपांची वस्तुस्थिती काय आहे, याचा हिशोब शासकीय अभिलेखांच्या आधारे समोर येण्याची वेळ आली आहे.
गेल्या दीड महिन्यापासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाची शासनाने घेतलेली दखल ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. नऊ तक्रारींच्या अनुषंगाने आता जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडून सखोल चौकशी व अहवाल अपेक्षित असताना ही प्रक्रिया संथगतीने चालणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. केवळ पत्रव्यवहार करून किंवा चौकशीचे आदेश काढून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. प्रत्यक्ष अभिलेख तपासणी, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश येऊनही प्रत्यक्षात संबंधित अधिकाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याचा संशय अधिक बळावेल, असा इशारा आंदोलक गणेश पवार यांनी दिला आहे.
कराड तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी साहीला शब्बीर नायकवडे यांच्या प्रकरणाने आता संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेलाच प्रश्नांच्या भोवऱ्यात उभे केले आहे. साहीला नायकवडे यांच्याविरोधात समोर आलेल्या गंभीर अनियमिततांच्या पार्श्वभूमीवर त्यांना वाचविण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले? कोणत्या अधिकाऱ्यांनी चौकशीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केला? कोणत्या स्तरावरून त्यांना मदत मिळाली? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणातील अहवाल आणि पुरावे तपासताना आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली का? असे अनेक प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केले आहेत. केवळ संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करून प्रकरण संपविण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध केला जाईल. ज्यांनी ज्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्येक अधिकाऱ्याची भूमिका, त्यांचा पत्रव्यवहार, निर्णय आणि उपलब्ध अभिलेख तपासून त्यांनाही कारवाईच्या कक्षेत आणण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. कोणताही वरिष्ठ अधिकारी, प्रशासकीय अधिकारी किंवा चौकशी अहवाल तयार करणारी यंत्रणा या प्रकरणात तपासणीच्या कक्षेबाहेर राहणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
या सर्व घडामोडींच्या अनुषंगाने आता उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका, चौकशीची कार्यपद्धती, सादर करण्यात आलेले अहवाल आणि त्यामधील वस्तुस्थिती यांना न्यायालयीन पातळीवर आव्हान देण्याची रणनीती आखण्यात येत आहे. उपलब्ध कागदपत्रे, तक्रारी, शासकीय पत्रव्यवहार आणि पुराव्यांच्या आधारे जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका न्यायालयासमोर मांडली जाणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात कोणालाही केवळ वरिष्ठ पदावर आहेत म्हणून अभय मिळणार नाही. चौकशी अहवालात त्रुटी, वस्तुस्थिती दडपण्याचा प्रयत्न किंवा संबंधितांना वाचविण्याची भूमिका पुराव्यांवरून समोर आल्यास त्याबाबतही न्यायालयीन दाद मागितली जाईल. त्यामुळे आता हा लढा केवळ आंदोलनापुरता मर्यादित न राहता प्रशासकीय आणि न्यायालयीन पातळीवरही निर्णायक वळण घेणार आहे.
विशेष म्हणजे, आंदोलकांनी आता केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच नव्हे, तर संबंधित अधिकाऱ्यांना मदत करण्याचा किंवा त्यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी आणि त्यांच्या पीए यांच्या भूमिकेकडेही लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्या प्रकरणात कोणाकडून संपर्क करण्यात आला, कोणत्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, कोणत्या निर्णयामागे कोणाचा हस्तक्षेप होता, यासंदर्भातील माहिती व कागदपत्रे संकलित केली जात असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीला किंवा नेतेमंडळींना त्यांच्या पदाचा प्रभाव वापरून प्रशासकीय कारवाई रोखता येणार नाही. साहीला नायकवडे यांना वाचविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, त्यांची भूमिका पुराव्यांसह जनतेसमोर आणल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
अधिकारी एका ठिकाणी काही वर्षे कार्यरत राहतात आणि त्यानंतर त्यांची बदली होते; मात्र लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी आणि त्यांच्या पीए यांना त्याच मतदारसंघात जनतेसमोर काम करावे लागते. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक कामकाजावर आता आंदोलकांची नजर राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्या विकासकामासाठी किती निधी मंजूर झाला, प्रत्यक्षात किती काम झाले, निधीचा वापर कसा झाला, कामांच्या मंजुरीपासून अंमलबजावणीपर्यंत कोणाची भूमिका होती आणि कमिशनच्या कथित व्यवहारांबाबत काही पुरावे उपलब्ध आहेत का, या सर्व बाबींची माहिती संकलित केली जात आहे. शासकीय निधी आणि विकासकामांच्या नावाखाली कोणताही गैरव्यवहार होत असल्याचे पुराव्यांसह समोर आल्यास संबंधितांची नावे, कागदपत्रे आणि व्यवहारांची माहिती जनतेसमोर आणली जाईल, असा मोठा दावा आंदोलकांनी केला आहे. हा केवळ इशारा नसून पुढील आंदोलनाची आणि तक्रारींच्या मोहिमेची रणनीती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आंदोलकांनी लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी, त्यांचे पीए आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना थेट सवाल केला आहे की, जनतेने तुम्हाला जबाबदारी दिली आहे ती जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी की कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी? प्रशासनावर दबाव टाकून कोणाला वाचविण्याचा प्रयत्न झाला असेल, तर त्याचे पुरावे समोर आल्यावर संबंधितांनी जनतेला उत्तर द्यावे लागेल. यापुढे कोणताही अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्ती आपल्या पदाचा, राजकीय संपर्काचा अथवा प्रशासकीय अधिकाराचा वापर करून तक्रारी दडपण्याचा प्रयत्न करणार असेल, तर त्याच्याविरोधातही स्वतंत्र तक्रार, पुराव्यांसह पाठपुरावा आणि आवश्यकतेनुसार न्यायालयीन कारवाईचा मार्ग स्वीकारला जाईल. प्रत्येकाला त्याच्या कृतीची जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि प्रत्येकाची भूमिका जनतेसमोर मांडली जाईल, असा गंभीर इशारा आंदोलकांनी दिला आहे.
आता जिल्हाधिकारी सातारा यांच्यासमोर नऊ तक्रारींच्या चौकशीचा महत्त्वाचा टप्पा आहे. उपसचिव प्रमोद पाटील यांच्या निर्देशानुसार निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक व स्वयं स्पष्ट अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. या चौकशीत कोणाला वाचविण्याचा प्रयत्न झाला, तर संबंधित अधिकाऱ्यांची नावे आणि पुरावे पुढील तक्रारींमध्ये समाविष्ट केले जातील. वरिष्ठ अधिकारी असोत, चौकशी अहवाल तयार करणारे असोत, लोकप्रतिनिधी असोत, नेतेमंडळी असोत किंवा त्यांचे पीए असोत, पुराव्यांच्या आधारे प्रत्येकाची भूमिका तपासण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. साहीला नायकवडे प्रकरणातील जबाबदारी निश्चित होऊन दोषींवर नियमानुसार कारवाई, संबंधितांना मदत करणाऱ्यांची भूमिका उघड आणि आवश्यकतेनुसार उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल होईपर्यंत आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेतले जाणार नाही. आता प्रशासनाने आंदोलकांच्या तक्रारींना गांभीर्याने घेऊन न्याय द्यायचा की आणखी मोठ्या प्रशासकीय आणि न्यायालयीन संघर्षाला सामोरे जायचे, हे संबंधित अधिकाऱ्यांनी ठरवावे, असा निर्णायक इशारा आंदोलक गणेश पवार यांनी दिला आहे.
पुढील 3.30 च्या भागात – तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या कार्यकाळातील कलम 150 व 155 च्या निर्णयाची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे विभागीय आयुक्त यांना मंत्रालयाकडून निर्देश



