साहीला नायकवडे यांच्या निलंबनाचा स्वयं स्पष्ट अहवाल मंत्रालयात कधी पोहोचणार? उपसचिवांच्या स्मरणपत्रानंतरही विभागीय आयुक्तांकडून दिरंगाई का? साडेचार महिन्यांच्या आंदोलनाची दखल नाही; कारवाई न झाल्यास अहवालाच्या विरोधात न्यायालयात रिट पिटिशन दाखल करण्याचा आंदोलकांचा इशारा!
विश्व सिटी न्यूज विशेष वृत्तमालिका भाग - 136 वा

कराड : कराड तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती साहीला शब्बीर नायकवडे यांच्या कार्यकाळातील कथित गंभीर अनियमितता आणि चुकीच्या कारभाराच्या अनुषंगाने त्यांना तातडीने निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला साडेचार महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. कराडपासून सुरू झालेले हे आंदोलन आता मुंबईतील आझाद मैदानापर्यंत पोहोचले असून, मुंबईतील आंदोलनालाही दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र, एवढा मोठा कालावधी उलटूनही संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाबाबत आणि खातेनिहाय कारवाईबाबत शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्रव्यवहारानंतरही प्रत्यक्ष कारवाई नेमकी कोणत्या टप्प्यावर अडकली आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
या प्रकरणात मंत्रालयातील अवर सचिवांनी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार करून साहीला नायकवडे यांच्या प्रकरणासंदर्भात स्वयं स्पष्ट अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या पत्रव्यवहारातून संबंधित प्रकरणातील कारवाईची वस्तुस्थिती, जबाबदारी निश्चिती आणि पुढील प्रशासकीय निर्णय याबाबत स्पष्टता अपेक्षित होती. मात्र, एवढा कालावधी उलटूनही शासनाला अपेक्षित असलेला स्वयं स्पष्ट अहवाल अद्याप प्राप्त झाला आहे का? प्राप्त झाला नसेल तर तो कोणत्या कारणामुळे प्रलंबित आहे? विभागीय स्तरावर हा अहवाल तयार करण्यासाठी नेमकी कोणती अडचण आहे? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, मंत्रालयातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे उपसचिव प्रमोद पाटील यांच्याकडून आता विभागीय आयुक्तांना स्मरणपत्र पाठवून यापूर्वी मागविण्यात आलेल्या स्वयं स्पष्ट अहवालाची पुन्हा आठवण करून देण्यात आली आहे. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच एखाद्या गंभीर प्रकरणात वारंवार स्मरणपत्र काढण्याची वेळ येत असेल, तर विभागीय स्तरावरील संबंधित अधिकारी आपली प्रशासकीय जबाबदारी नेमकी कशा पद्धतीने पार पाडत आहेत? शासनाच्या पत्रव्यवहाराला वेळेत उत्तर देणे हीदेखील प्रशासकीय जबाबदारी नाही का? आंदोलन सुरू असल्याची माहिती असतानाही या प्रकरणात ठोस निर्णय घेण्यास एवढी दिरंगाई का होत आहे? असे सवाल आंदोलकांकडून उपस्थित केले जात आहेत.
आता उपसचिव प्रमोद पाटील यांच्या स्मरणपत्रानंतर तरी विभागीय आयुक्तांकडून साहीला नायकवडे यांच्या कथित चुकीच्या कारभाराच्या अनुषंगाने निलंबन, खातेनिहाय चौकशी आणि पुढील प्रशासकीय कारवाईबाबत स्पष्ट शिफारशींसह स्वयं स्पष्ट अहवाल शासनाकडे पाठविला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केवळ पत्रव्यवहार करून किंवा अहवाल मागविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून या प्रकरणाची जबाबदारी संपणार आहे का? साडेचार महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या तक्रारदाराच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी आणखी किती महिने लागणार आहेत? मंत्रालयाने स्मरणपत्र काढल्यानंतरही अहवाल सादर होत नसेल, तर या विलंबाची जबाबदारी निश्चित करण्याची आवश्यकता नाही का?
दरम्यान, या प्रकरणाच्या अनुषंगाने यापूर्वी सादर करण्यात आलेल्या तक्रारी, चौकशी समितीचा अहवाल आणि त्यातील नमूद करण्यात आलेल्या गंभीर अनियमिततांचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी आंदोलकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, आंदोलन सुरू असतानाही प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्य दाखविले जात नसल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे. सामान्य नागरिकाने तक्रार केल्यानंतर त्यावर वेळेत निर्णय घेण्याची अपेक्षा असते; मग शासनाच्या स्वतःच्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहवाल मागविल्यानंतरही त्याची पूर्तता वेळेत का होत नाही? प्रशासनातील कनिष्ठ अधिकारी वरिष्ठांच्या आदेशांना किती गांभीर्याने घेतात, याचेच हे उदाहरण ठरत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या संपूर्ण प्रकरणात आता आंदोलकांनी न्यायालयीन लढाईचा पर्यायही स्पष्ट केला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून तसेच विविध तक्रारी अर्जांद्वारे करण्यात आलेल्या मागण्यांचा योग्य विचार करून संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली नाही, अथवा स्वयं स्पष्ट अहवालाच्या माध्यमातून वस्तुस्थिती लपविण्याचा किंवा जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले, तर संबंधित प्रशासकीय निर्णय आणि कार्यपद्धतीला न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. यासाठी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटिशन (Writ Petition) दाखल करून संबंधित प्रकरणातील प्रशासकीय दिरंगाई, कारवाईतील निष्क्रियता आणि तक्रारींच्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयांची न्यायालयीन तपासणी करण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
साडेचार महिन्यांचे आंदोलन, कराड ते आझाद मैदान मुंबईपर्यंतचा संघर्ष, मंत्रालयातील पत्रव्यवहार आणि आता उपसचिवांचे स्मरणपत्र, एवढ्या घडामोडींनंतरही साहीला नायकवडे यांच्या प्रकरणात ठोस निर्णय होत नसेल, तर प्रशासनाच्या उत्तरदायित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आता विभागीय आयुक्तांकडून स्वयं स्पष्ट अहवाल कधी सादर होणार, मंत्रालय संबंधित अहवालाच्या आधारे निलंबन व खातेनिहाय कारवाईचा निर्णय कधी घेणार आणि आंदोलकांना न्याय कधी मिळणार? की प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात अखेर न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ येणार? या प्रश्नांची उत्तरे आगामी काळात स्पष्ट होतील. मात्र, कारवाईचा ठोस आदेश मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
दुपारी 1.30 च्या भागात – जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने व सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मंत्रालयाकडून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश?



