तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या कार्यकाळातील कलम १५० व १५५ च्या निर्णयांची मंत्रालयाकडून तपासणी! ३२-ग ची प्रकरणे, पोकळ नोंदी, एकुम्याच्या नोंदी आणि वर्ग दोनच्या जमिनींचे प्रकरण ऐरणीवर; अधिकार नसताना निर्णय कोणत्या आधारावर दिले? विभागीय आयुक्त, पुणे यांना तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश; निलंबन व खातेनिहाय चौकशीची मागणी!
विश्व सिटी न्यूज विशेष वृत्तमालिका भाग - 138 वा

कराड : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १५० हे फेरफार नोंदी आणि त्यावरील हरकतींच्या कायदेशीर प्रक्रियेशी संबंधित आहे, तर कलम १५५ हे अधिकार अभिलेखातील लेखन किंवा अभिलेखीय चुका दुरुस्त करण्यासंदर्भात आहे. या दोन्ही कलमांच्या अधिकारमर्यादेत राहूनच निर्णय देणे अपेक्षित असताना, कराडच्या तत्कालीन तहसीलदार कल्पना ढवळे यांनी आपल्या कार्यकाळात या कलमांचा आधार घेऊन अधिकारमर्यादेबाहेरील आणि चुकीचे निर्णय दिल्याचा स्पष्ट आरोप तक्रारदार तथा आंदोलक गणेश तुकाराम पवार यांनी केला आहे. या संदर्भात संबंधित आदेश आणि पुराव्यांसह महसूल मंत्री, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या तक्रारीच्या अनुषंगाने मंत्रालय स्तरावरून विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे संबंधित सर्व प्रकरणांची तपासणी करून तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गणेश पवार यांच्या तक्रारीतील मुख्य आक्षेप असा आहे की, कलम १५० व १५५ अंतर्गत तहसीलदारांना ज्या स्वरूपाचे निर्णय देण्याचा अधिकार नाही, अशा स्वरूपाचे निर्णय कल्पना ढवळे यांनी आपल्या कार्यकाळात कोणत्या कायदेशीर अधिकाराने आणि कोणत्या आधारावर दिले? केवळ महसुली नोंदींमधील दुरुस्तीच्या मर्यादित अधिकारांचा वापर करून जमिनींचे हक्क, मालकीचे स्वरूप, खातेदारांच्या नोंदी आणि इतर महत्त्वाच्या महसुली बाबींमध्ये बदल करणारे निकाल देण्यात आले का? कायद्याने निर्धारित केलेल्या अधिकारमर्यादेच्या बाहेर जाऊन आदेश पारित करण्यात आले असतील, तर अशा आदेशांचा कायदेशीर आधार काय होता? हाच या तक्रारीचा केंद्रबिंदू आहे.
विशेषतः ३२-ग अंतर्गत प्रकरणांचा संदर्भ असतानाही कलम १५५ अंतर्गत निर्णय देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ३२-ग अंतर्गत कायदेशीर कार्यवाहीशी संबंधित जमिनींच्या बाबतीत कलम १५५ चा आधार घेऊन निर्णय देण्याचा अधिकार नेमका कुठून प्राप्त झाला? संबंधित कायदेशीर कार्यवाहीचा विचार न करता किंवा तिच्या परिणामांची पडताळणी न करता जमिनींच्या नोंदींवर परिणाम करणारे आदेश देण्यात आले का? अशा प्रकरणांमध्ये कलम १५५ चा वापर कायदेशीर मर्यादेत होता का? याची प्रत्येक प्रकरणाच्या मूळ कागदपत्रांवरून तपासणी होणे आवश्यक आहे.
तसेच कल्पना ढवळे यांच्या कार्यकाळात महसुली अभिलेखांमधील पोकळ नोंदी कमी करण्यासाठी किंवा वगळण्यासाठी कलम १५० व १५५ अंतर्गत आदेश देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोकळ नोंदी कमी करण्याचा अधिकार कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार वापरण्यात आला? त्या नोंदींची सत्यता आणि कायदेशीर स्थिती तपासण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती का? अशा नोंदी कमी करण्याच्या नावाखाली प्रत्यक्ष खातेदारांचे अधिकार किंवा वैध नोंदी कमी करण्यात आल्या का? या सर्व आदेशांची चौकशी होणे आवश्यक आहे.
याचबरोबर एकुम्याच्या नोंदी कमी करण्याचे आदेश देण्यात आल्याचाही गंभीर आरोप आहे. एकुम्याच्या नोंदी कमी करण्यासाठी कलम १५० व १५५ चा आधार घेण्याचा कायदेशीर अधिकार तहसीलदारांना होता का? संबंधित खातेदारांचे हक्क, मालकीचे स्वरूप आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया तपासल्याशिवाय अशा प्रकारचे निर्णय देण्यात आले का? एकुम्याच्या नोंदी कमी करण्याचे आदेश देण्यामागे नेमका कोणता कायदेशीर आधार होता? या आदेशांची मूळ अभिलेखांसह तपासणी करून त्यातील कायदेशीर वैधता निश्चित करणे आवश्यक आहे.
वर्ग दोनच्या जमिनींच्या संदर्भातही कल्पना ढवळे यांच्या कार्यकाळातील निर्णयांवर गंभीर आक्षेप घेण्यात आला आहे. वर्ग दोनच्या जमिनींचे वर्ग एकमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेली शासकीय प्रक्रिया, सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी आणि लागू अटी पूर्ण होण्यापूर्वीच संबंधित जमिनींच्या नोंदी किंवा हक्कांवर परिणाम करणारे निर्णय देण्यात आल्याचा आरोप आहे. वर्ग एकमध्ये रूपांतराची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच असे निर्णय देण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने दिला होता? आवश्यक मंजुरी आणि प्रक्रिया पूर्ण नसताना असे आदेश कोणत्या आधारावर पारित करण्यात आले? या बाबींचीही स्वतंत्र तपासणी होणे गरजेचे आहे.
या सर्व निर्णयांच्या अनुषंगाने कराड तालुक्यात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चाही सुरू असल्याचे बोलले जात आहे. काही निर्णय आर्थिक देवाणघेवाणीच्या जोरावर देण्यात आले होते का? कलम १५० व १५५ अंतर्गत अधिकारमर्यादेबाहेरील निर्णय देण्यामागे कोणते आर्थिक हितसंबंध होते का? या चर्चेमध्ये तथ्य आहे का? या संदर्भातील आर्थिक व्यवहारांचे पुरावे उपलब्ध आहेत का? याचीही सक्षम यंत्रणेमार्फत पडताळणी व्हावी, अशी मागणी उपस्थित होत आहे. आर्थिक व्यवहार झाल्याचा मुद्दा सध्या चर्चेच्या स्वरूपात असून त्याची सत्यता अधिकृत तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.
गणेश पवार यांनी या सर्व बाबी केवळ तोंडी आरोप म्हणून मांडलेल्या नसून, संबंधित प्रकरणांचे आदेश आणि उपलब्ध पुराव्यांसह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारीमध्ये कल्पना ढवळे यांच्या संपूर्ण कार्यकाळातील कलम १५० व १५५ अंतर्गत दिलेल्या सर्व निर्णयांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मंत्रालय स्तरावरून या तक्रारीची दखल घेण्यात आली असून विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे कल्पना ढवळे यांच्या कार्यकाळातील संबंधित सर्व प्रकरणांची तपासणी करून तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आता विभागीय आयुक्त, पुणे यांनी कल्पना ढवळे यांच्या संपूर्ण कार्यकाळातील सर्व संबंधित आदेशांची निष्पक्ष आणि सखोल तपासणी करणे अपेक्षित आहे. प्रत्येक आदेश कोणत्या कलमाखाली देण्यात आला, त्या कलमाने तहसीलदारांना असा निर्णय देण्याचा अधिकार होता का, आदेश देताना कोणते पुरावे विचारात घेतले, मूळ फेरफार नोंदींमध्ये काय बदल करण्यात आले आणि त्या निर्णयामुळे संबंधित खातेदारांच्या हक्कांवर काय परिणाम झाला, या सर्व बाबींची स्पष्ट नोंद अहवालात असणे आवश्यक आहे. तपासणीत अनियमितता किंवा अधिकारमर्यादेचे उल्लंघन आढळल्यास त्यानुसार योग्य ती प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रारदाराची मागणी आहे.
या प्रकरणात गणेश पवार यांनी तहसीलदार कल्पना ढवळे यांना निलंबित करून स्वतंत्र खातेनिहाय चौकशी सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने मुंबईतील आझाद मैदान येथे त्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडून होणाऱ्या तपासणीमध्ये अधिक स्पष्टीकरण किंवा अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता भासल्यास तक्रारदार गणेश पवार स्वतःकडील अधिकचे लेखी पुरावे, संबंधित आदेशांच्या प्रती आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तपासणी प्रक्रियेत आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
आता अपेक्षा आहे ती निष्पक्ष तपासणीची आणि योग्य प्रशासकीय कारवाईची! तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या कार्यकाळातील कलम १५० व १५५ अंतर्गत दिलेल्या सर्व निर्णयांची कायदेशीर पडताळणी करून विभागीय आयुक्त, पुणे यांनी वस्तुनिष्ठ अहवाल तत्काळ शासनाकडे सादर करावा. तपासणीमध्ये जे दोष किंवा अनियमितता निष्पन्न होतील, त्यानुसार शासन व महसूल प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. तक्रारदार गणेश पवार यांनी अतिरिक्त पुरावे देण्याची तयारी दर्शवली असल्याने सर्व संबंधित कागदपत्रांचा विचार करून या प्रकरणाची सत्यस्थिती समोर यावी आणि कायद्यानुसार योग्य निर्णय व्हावा, हीच आता प्रमुख अपेक्षा आहे.
पुढील भागात – तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या कार्यकाळामध्ये कलम १५० व १५५ चे दिलेल्या आदेशांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये तपासणी अधिकाऱ्यांना हे चुकीचे आदेश दिसून आले नाहीत का?



