मनोज जरांगेंनी उपोषण करुन आत्मक्लेश थांबवायला हवा : छगन भुजबळ

मुंबई : मनोज जरांगेंनी उपोषण करुन आत्मक्लेश थांबवायला हवा, असं वक्तव्य ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. मागील सहा दिवसांपासून मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे. यावर आता भुजबळांनी प्रतिक्रिया दिली.
छगन भुजबळ म्हणाले की, “मनोज जरांगेंनी उपोषण करुन आत्मक्लेश थांबवायला हवा. ओबीसींना धक्का न लागता त्यांच्या मागण्या पूर्ण होतील यावर सरकार विचार करत आहे. आताच सर्वजण निवडणूकीतून मोकळे झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी सरकारला वेळ द्यायला हवा. सरकारला किंवा कुठल्याही पक्षाला दलित, आदिवासी, अस्पसंख्यांक, मराठा, ओबीसी आणि भटके विमुक्त अशा सर्व घटकांना बरोबर घेऊन जावं लागतं. त्यामुळे विचार करुन निर्णय घ्यावे लागतात,” असे ते म्हणाले.
जरांगेंनी केलेल्या टीकेबद्दल बोलताना ते म्हणाले की, “छगन भुजबळ अनेक वर्ष टीकेचे घाव सोसत आलाय. त्यामुळे त्याची काळजी करण्याची गरज नाही. मी फक्त एवढंच म्हणतो की, कोणत्याही समाजाच्या अधिकाराला धक्का न लावता जो निर्णय घेता येईल तो घ्यावा. कुणी कितीही शिव्या दिल्या तरी माझा हा मुद्दा मी कधीही सोडणार नाही. यासाठी मी मागच्या वेळी मंत्रीपदही सोडायला तयार झालो होतो,” असेही ते म्हणाले.