क्राइमराज्यसातारा

बनावट दारू तयार करून विक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापा

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ः पाचजण ताब्यात ः 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

कराड ः जुळेवाडी ता. कराड गावच्या हद्दीत बनावट दारू तयार करुन त्याची विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर छापा टाकून उत्पादन शुल्क विभागाने पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 19 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रोहित रमेश सोळवंडे (वय 26, रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली), फैय्याज मुसा मुल्ला (53, रा. मलकापूर), शेखर गुणवंत बनसोडे (50), आयाज अबू मुल्ला (53), इर्शाद उर्फ बारक्या शहाबुद्दीन मुल्ला (34, सर्वजण रा. रेठरे बुद्रूक, ता. कराड) अशी उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा व कराड येथील भरारी पथकाने रविवारी दुपारी जुळेवाडी गावच्या हद्दीत रोहित सोळवंडे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून बनावट देशी दारूचा साठा व चारचाकी वाहन जप्त केले. त्याच्याकडे चौकशी केली असता जुळेवाडी येथे एका देशी दारू दुकानाच्या पाठीमागे ही दारू तयार केली जात असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून फैय्याज मुल्ला आणि शेखर बनसोडे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडूनही बनावट दारूचा साठा आणि चारचाकी वाहन जप्त केले. त्यानंतर मलकापूर येथे एका हॉटेलच्या पाठीमागे तसेच रेठरे बुद्रूक येथील चौकी परिसरातील मुलाणकी नावच्या शिवारात छापे टाकून आयाज मुल्ला आणि इर्शाद उर्फ बारक्या मुल्ला या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून बनावट दारूचा साठा तसेच दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य, मशीन, बनावट लेबल, बनावट बूच यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले. चार ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण 19 लाख 12 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच पाचजणांना अटक करण्यात आले.

दरम्यान, जुळेवाडी येथील देशी दारू दुकान मालक संबंधित दुकानातून बनावट दारूची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे संबंधित दुकानावरही विभागीय गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा व कराड कार्यालयाच्या भरारी पथकांनी केली आहे.
सदर कारवाईमध्ये सर्वश्री निरीक्षक माधव चव्हाण, संजय साळवे, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, शरद नरळे, प्रशांत नागरगोजे सहा.दु. निरीक्षक नितीन जाधव, महेश मोहिते, सागर आवळे, मनिष माने, भिमराव माळी, अजित रसाळ, आबासाहेब जानकर, राजेंद्र अवघडे, अरुण जाधव, किरण जंगम, सचिन जाधव, राणी काळोखे जवान यांनी सहभाग घेतला. गुन्हयाचा पुढील तपास निरिक्षक माधव चव्हाण हे करीत आहेत.

चौकट ः

दरम्यान, जिल्हयामध्ये बनावट दारु तसेच हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारुची निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ या कार्यालयास देण्यात यावी, असे आवाहन सातारा विभागाच्या अधिक्षक किर्ती शेडगे यांनी केले आहे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close