
कराड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मळाई ग्रुपच्यावतीने संविधानाच्या प्रतींचे ५०० व्यक्तींना मोफत वाटप करण्यात आल्या आहे. राज्यघटनेचे घरोघरी वाचन होण्याची गरज असल्याने हा उपक्रम राबवण्यात आला असून संविधानविषयी लोकजागृती करण्यासाठी श्री मळाई ग्रुप व समाजप्रबोधन सार्वजनिक वाचनालय नेहमी पुढाकार घेईल, असे मत श्री मळाई ग्रुपचे प्रमुख शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी व्यक्त केले.
श्री मळाई ग्रुप व समाजप्रबोधन सार्वजनिक वाचनालय, मलकापूर यांच्या वतीने ‘हर घर संविधान’ व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारंभ नुकताच आदर्श ज्युनिअर कॉलेज मलकापूर येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते गणेश लोहार, मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ.सौ. स्वाती थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख वक्ते छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राध्यापक गणेश लोहार म्हणाले, संविधान निर्मितीवेळी विविध देशांच्या संविधानातील भारतीय समाज व्यवस्थेला पूरक ठरतील, असे कायदे स्वीकारून त्या कायद्यामध्ये फेरबदल करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. संविधानाचे महत्त्व व त्याचे राबवणूक करणारे लोकप्रतिनिधी यांची संविधानाप्रती असणारी जबाबदारी त्यांनी अधोरेखित केले.
प्रास्ताविक डॉ.सौ. स्वाती थोरात यांनी संविधानाचे स्वरूप, त्यातील उद्दिष्टे, त्याच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे कामकाज यावर भाष्य करत केले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष पी.जी. पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के, संचालक वसंतराव चव्हाण, पतसंस्थेचे चेअरमन अजित थोरात, अरुणादेवी पाटील, प्रा.एम.एस. जाधव, संजय तडाके, डॉ. राजेंद्र कंटक यांच्यासह विविध स्तरातील मान्यवर, डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, लेखक, कवी, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी, वाचनालयाचे नियमित वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. शीला पाटील प्रा. एस.डी. खंडागळे यांनी आभार मानले.