
पुणे : अहमदाबाद येथे होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामान्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यातील सट्टेबाजीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सट्टेबाजांवर करडी नजर ठेवली आहे.
देशभरात सुरत, अहमदाबाद, कच्छ, जयपूर, शिमोगा, कोलकात्ता, बंगळुरू, इंदुर, मुंबईमध्ये क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी मोठ्या प्रमाणात चालते. गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळण्याचे प्रमाण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वाढीस लागले आहे. सट्टेबाजीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. कोरेगाव पार्क, कोंढवा तसेच पुण्यालगत असलेल्या लोणावळा, खंडाळा, कर्जत, पनवेल, पाचगणी परीसरात खासगी बंगले भाड्याने सट्टा घेतात. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजी होणार असल्याने सट्टेबाजांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पथकांना देण्यात आले आहेत.
आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांच्या तपासात या प्रकरणाचे धागेदोरे दुबई, नागपूर, मुंबई या शहरात असल्याची माहिती तपासात पुढे आली होती. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने कोंढव्यातील एका सदनिकेत छापा टाकून २० मे २०२३ रोजी तीन सट्टेबाजांना अटक केली होती. त्यामध्ये शहरातील एका पब मालकाचा समावेश होता.