
पुणे: राहूल गांधी यांना ना त्याचा पक्ष गंभीरपणे घेत ना जनता. मग मी तरी कशाला त्यांचा विचार करू? अशा तिखट शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भिती त्यांनाच आहे जे भ्रष्टाचारी आहेत, दुराचारी आहेत. तेच बोलत असतात असे ते म्हणाले.
भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बागेश्वरी धामचे धिरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग व प्रवचनांचे संगमवाडीमध्ये आयोजन केले होते. तीन दिवसाच्या या संत्सगाचा फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी समारोप झाला. तिथे जाण्यापूर्वी पत्रकारांबरोबर बोलताना फ़डणवीस यांनी राहूल यांना लक्ष्य केले. विश्वचषकात भारताचा पराभव झाल्याबद्दल बोलताना राहूल गांधी यांनी पंतप्रधानांसाठी अवमानकारक शब्द वापरला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, पंतप्रधान हे देशातील गरीब जनेतेचे मसिहा आहेत. ते त्यांच्यासाठीच काम करतात. पंतप्रधानांची भिती त्यांनाच वाटते जे भ्रष्टाचारी व दुराचारी आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी कुणबी नोंदी सापडत आहेत, त्याचे काय करणार यावर बोलताना फडणवीस यांनी त्याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, व जे माहिती नाही त्यावर बोलणार नाही असे उत्तर दिले. माहिती घेऊ व नंतरच यावर बोलू असे ते म्हणाले. कार्तिकी एकादशीला विठ्ठलाकडे काय मागणार याबाबत उद्या बोलू असे सांगत त्यांनी यावर काहीही उत्तर देणे टाळले.