
कराड ः लोकसभा निवडणुकांमध्ये सध्या भाजपविरोधी वातावरण आहे. हे दोन टप्प्यांमधील लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरून दिसून आले. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, अग्निवीर आदींबाबत आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक समाजासह इतरही लोक नाराज आहेत. विकासाच्या मुद्दा सोडून जातीजाती, समाजसमाजात टेड निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून हिंदु-मुस्लिम ध्रुवीकरणाबाबत लोकांमध्ये चिड निर्माण झाले असून भाजपला याचा मोठा फटका बसेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा मुजफ्फर हुसेन यांनी रविवारी प्रचारदौरा केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे झकीर पठाण उपस्थित होते.
हुसेन म्हणाले, भाजपच्या ‘अबकी बार 400 पार’ चा आकडा आता निम्म्यावर आला आहे. त्यामुळे संयम सुटलेले पंतप्रधान प्रचारसभांमध्ये खालच्या पातळीवर घसरत आहेत, हे कोणालाही आवडलेले नाही. तसेच निवडणूक आयोगाने सांगितलेले मतदानाचे आकडे वाढवून सांगणे हे चुकीचे आहे. निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य करणे योग्य नसून हा निवडणूक आयोगाचा अपमान आहे.
ते म्हणाले, संपूर्ण राज्यभरात प्रचाराच्या अनुषंगाने फिरताना इंडिया आघाडीला चांगले वातावरण असल्याचे दिसून येत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातही शशिकांत शिंदे यांना पोषक वातावरण असून ते चांगल्या मतांनी निवडून येतील. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे. त्याचा फायदा नक्कीच शशिकांत शिंदे यांना होईल, असा विश्वासही त्यांनी वेळी व्यक्त केला.
कराडमधील सभेत पंतप्रधानांनी कर्नाटकातील मुस्लिमांना काँग्रेसने एका रात्रीत ओबीसीचे आरक्षण दिले. यावर विचारले असता ते म्हणाले, नरेंद्र मोदी फक्त ‘सबका साथ सबका विकास’ म्हणतात. मात्र, त्यांच्या कृतीतून ते दिसून येत नाही. जर काँग्रेसने कर्नाटकात मुस्लिमांना ओबीसीमधून आरक्षण दिले असेल, तर ते घटनेनुसारच दिले असेल. मात्र, पंतप्रधान डिक्टेटरसारखे वागतात, हे यावरून दिसून येते. सर्वसामान्यांचा विकास होणे महत्त्वाचे आहे. सर्वांना पुढे घेऊन जाणे आपली जबाबदारी असून काँग्रेसने सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली आहे. नरेंद्र मोदींनी तर काँग्रेसच्या जाहीरनामाला मुस्लिमांचा जाहीरनामा म्हटले आहे. यावरून समाजासमाजात द्वेष पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न लक्षात येतो. महाराष्ट्रासह तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ येथेही भाजपला अपेक्षित यश मिळणार नाही. 303 चा आकडा भाजपला पुन्हा मिळवणे मुश्किल असल्याचा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला.